शहरातील व्यापारी व नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या पुराचे पाणी ओसरले असून नगरपालिका प्रशासनाने आता शहरात सर्वत्र युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. परंतु वाशिष्ठी नदीची पाणी पातळी सतत कमीजास्त होत असून भरतीची वेळ आणि कोळकेवाडी धरणातून होणारा विसर्ग यामुळे शहरात अद्यापही काही सखल भागात पाणी घुसत असल्याने धोका कायम असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाशिष्ठीची पाणी पातळी इशारा पातळीच्या जवळपास खेळत असल्याने प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोमवारी रात्रीपासून चिपळूण परिसरात अविश्रांत पाऊस पडत राहिला. तर मंगळवारी सकाळी पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. तसेच कोळकेवाडी परिसरात २४ तासात तब्बल २२० मिमी. इतका प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे वाशिष्ठी नदीने यावर्षी प्रथमच इशारा पातळी ओलांडली आणि पुराचे पाणी चिपळूण शहर व बाजारपेठेत घुसले. दुसऱ्या बाजूने शिवनदीने देखील जोरदार आक्रमण केले. त्यामुळे दोन्ही बाजूने पुराचे पाणी अत्यंत वेगाने शहरात घुसले.
तासाभरात चिपळूण शहरात सुमारे २ ते ३ फूट इतके पाणी होते. तर नदीकाठ परिसरात ४ फुटापर्यंत पुराचे पाणी पोहचले होते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले होते. अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तर अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळी व खेडर्डीतदेखील पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे बचाव पथकांची चांगलीच धावपळ उडाली. परंतु आपत्तीनिवारण पथक व प्रशासनाने परिस्थिती उत्तमपणे हाताळली, त्यामुळे फारसे नुकसान झालेले नाही.
पाणीपातळी घसरली – दरम्यान ५.९० पर्यंत पोहचलेली पाणी पातळी मंगळवारी संध्याकाळी हळूहळू खाली येऊ लागली आणि पुराचे पाणी ओसरू लागले. परंतु पाणी ओसरण्याचा वेळ अतिशय मंद होता. तसेच पुन्हा भरती आणि कोळकेवाडी धरणातून होणारा विसर्ग त्यामुळे रात्री पाणी पातळी पुन्हा काही प्रमाणात वाढली होती. परंतु प्रशासन पूर्ण अलर्ट होते. भरतीओहटी, विद्युत निर्मिती आणि धरणाची पाणीपातळी समतोल ठेवण्यासाठी केला जाणारा विसर्ग याबाबत योग्य समनवय ठेवण्यात प्रशासन यशस्वी ठरले होते. त्यामुळे कोणतीही धोकादायक परिस्थिती उद्भवली नाहीं.
पावसाची विश्रांती – रात्री पावसानेदेखील काहीशी विश्रांती घेतली आणि पुराचे पाणी जलद पद्धतीने ओसरू लागले. पहाटे पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले. पाणी ओसरताच नगरपालिकेने तात्काळ शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. ४० हुन अधिक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून युद्धपातळीवर साफसफाई सुरू केली. तसेच व्यापाऱ्यांनीदेखील आपल्या दुकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली होती. प्रशासनातील सर्व अधिकारी शहरात विविध ठिकाणी पाहणी करून आढावा घेत होते.
वाशिष्ठी अजूनही इशारा पातळीवर – पावसाचा जोर कमी झाला असला तरी वाशिष्ठीची पाणी पातळी अद्यापही इशारा पातळीच्या जवळपास घुटमळत आहे. त्यामुळे भरतीच्यावेळी शहरात पाणी घुसण्याची भीती असल्याने प्रशासन व व्यापारी सतर्क राहिले आहेत.. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. या पुराचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही जीवित किंवा फार मोठी आर्थिक हानी झालेली नाही.