22.8 C
Ratnagiri
Wednesday, December 17, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeChiplunकॉक्रिटीकरणानंतर वाहनांचा वेग जीवघेणा, अपघात वाढले

कॉक्रिटीकरणानंतर वाहनांचा वेग जीवघेणा, अपघात वाढले

वर्षभरात ११ अपघातांत १६ लोकांना जीव गमवावा लागला आहे.

चिपळूण ते पिंपळी रस्त्याच्या रुंदीकरणानंतर तेथील वाहनांचा वेग सुसाट झाला आहे. वाहनांच्या वेगामुळे त्या रस्त्यावर वर्षभरात दुचाकींचे अपघात वाढले आहेत. रुंदीकरणानंतरचा रस्ता मोठा झाल्याने वाहने सुसाट अन् बेदरकार झाली आहेत. वर्षभरात ११ अपघातांत १६ लोकांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर बेदरकार वाहनांचा सुसाटपणाच स्थानिक गावांना धोक्याचा ठरत आहे. बहादूरशेख नाका ते पिंपळी मोहल्ल्यापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. बारा किमीच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी जोडरस्ते आहेत. पेढांबे फाटा, पिंपळीफाटा, आयटीआय येथून येणारा रस्ता, वेहळे गावातून येणारा रस्ता मुख्य रस्त्याला जोडला जातो. गावातून येणाऱ्या वाहनाला मुख्य मार्गावरील सुसाट वाहनाशी सामना करावा लागतो. अनेकवेळा या चौकातच अपघात होतात. रस्त्याच्या काही ठिकाणी तीव्र उतार आहे; मात्र, हे उतार लक्षात येत नाहीत. परिणामी, वाहने वेगात जातात अन् अपघात होतो. त्यामुळे उतार, सखल भाग, वळणाच्या ठिकाणी फलक गरजेचे आहेत.

वर्षभरात त्या रस्त्यावर जेवढे अपघात झाले आहेत त्यातील अनेक अपघात वाहनाच्या वेगामुळे व चालकाच्या चुकीमुळे झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. या मार्गावर खेडींची मोठी बाजारपेठ आहे. खेर्डीतील कोकण रेल्वेच्या पुलाखालील परिसर ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. दत्तमंदिरपासून पुढे रेल्वेपुलापर्यंतचा रस्ता मोकळा असतो. त्यामुळे येथे दुचाकी सुसाट चालवली जाते; मात्र अचानक समोरून वाहन आले तर येथे अपघात ठरलेला असतो. खेर्डीतील रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने उभी असतात. या वाहनांच्या आडून एखादी दुचाकी आली तर अपघात होतो. सती येथील नाक्यात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची संख्या खूप असते. येथे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.

अवजड वाहनांमुळे धोका – वाशिष्ठी डेअरी ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा आहे. तेथे खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीतील साहित्याची वाहतूक करणारी वाहने उभी केली जातात. एका ठिकाणी सिमेंटचे गोडाऊन आहे. तिथेही अवजड वाहने उभी केली जातात. त्या ठिकाणी अपघात होत आहेत.

पिंपळी खुर्द नाक्यावर विद्यार्थ्यांची गर्दी – पिंपळी खुर्द येथील नाक्यावर आवटीआयचे विद्यार्थी सुटल्यानंतर रस्त्यावर गर्दी असते. या वेळी दुचाकी चालक अत्यंत वेगाने ये-जा करत असतात. वाशिष्ठी डेअरी समोरच्या रस्त्यावरही दुचाकीसह चारचाकी चालकांचा वेग सुसाट असतो. येथील कालव्यावर असलेल्या अरुंद पूल अपघाताचे मोठे कारण आहे. चार महिन्यापूर्वी येथे मोटार, रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत पाचजणांचा जीव गेला होता. बहुतांशी दुचाकींचे अपघात या ठिकाणी झाले आहेत. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने सौरऊर्जेवर चालणारे छोटे सिग्नल लाईट बसवले आहेत; परंतु अपघात रोखण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्यात दुचाकी आदळतात आणि अपघात होतो. हे खड्डे चक्क मातीने बुजवले जात आहेत.

उपाययोजनांची आवश्यकता – रस्त्यावर वाहनांचा वेग व वाढती रहदारी लक्षात घेऊन तेथे उपाययोजना होण्याची गरज आहे. तसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्या रस्त्यावर सावधानतेचे अथवा बचावाचे फलक किंवा अपघातांची पूर्वसूचना देणारे फलक नाहीत. काँक्रिटच्या रस्त्यामुळे वाहनचालक वेगमयदिचे पालन होत नाही. प्रशस्त रस्त्यामुळे चालकांना लेनचेही भान राहात नाही.

RELATED ARTICLES

Most Popular