प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी चिपळूण शहराच्या प्रारूप मतदार यादीतील आक्षेपासंदर्भात सोमवारी सुनावणी घेतली. त्यानंतर मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसात चिपळुणातील १६०० अर्जाची छाननी केली. मतदार यादीत चिपळूण शहरात दाखल झालेली सुमारे ११०० नावे योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रांताधिकारी लिगाडे यांनी आज या संदर्भात आदेश जारी केले; मात्र दाखल झालेल्या अर्जाची छाननी करून मुदतीत निकाल देण्यासाठी प्रांताधिकारी व बीएलओ म्हणून काम केलेले कर्मचारी, अधिकारी मागील तीन दिवस पहाटे तीन वाजेपर्यंत मतदार छाननी करून मतदार यादी अंतिम करण्यासाठी झटत होते. चिपळूण शहराच्या नवीन मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका असल्याचा आरोप करत नागरिक तसेच राजकीय कार्यकर्त्यांनी तब्बल १६०० आक्षेप नोंदवले होते. मतदारांची नावे चुकीच्या वॉर्डात टाकणे, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरात आणणे अशा अनेक त्रुटी यादींवर आक्षेप घेतला होता.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर प्रांताधिकारी लिगाडे यांनी सोमवारी सर्व आक्षेपांची पडताळणी सुरू केली. नावनोंदणी करताना नेमण्यात आलेले बीएलओ यांनाही सुनावणीच्यावेळी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. सुनावणीपूर्वी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेप अर्जाची कर्मचाऱ्यांकडून स्थळ पाहणी करण्यात आली. नागरिकांचे आक्षेप योग्य आहेत की, बीएलओंनी नोंदवलेली मतदारांची नावे योग्य आहेत याची सविस्तर माहिती घेऊन त्याचा अहवाल प्रांताधिकारी यांना देण्यात आला. त्याच दरम्यान नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी १८ प्रभागातील मतदार याद्यांची छाननी सुरू केली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. त्या वेळी पालिकेतील प्रमुख अधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत हजर होते. त्यानंतर मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी स्थळ पाहणी करून अर्जाची छाननी सुरू होती. या प्रक्रियेचा पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी दिवसा पालिकेचे काम आणि पहाटे उशिरापर्यंत मतदार याद्या पडताळणीचे काम करत होते.
गुहागरमधील ७५ पैकी ५९ नावे बरोबर – गुहागर शहरातील मतदार यादीवर ७५ नागरिकांनी आक्षेप घेतले होते. बुधवारी प्रांताधिकारी यांनी गुहागर नगरपंचायतीत सुनावणी घेतली. ७५ पैकी ५९ नावे योग्य असल्याचे आढळून आले आहेत. उर्वरित नावांबाबत फेरविचार केला जाणार आहे.

