कोकणातून रेवस रेड्डी सागरी मार्ग (कोस्टल रोड) उभारण्यात येत आहे. त्या मार्गानजीक असलेल्या पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, यासाठी विकासकेंद्र उभारली जाणार आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील आंबोळगड गावाचा समावेश आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला भविष्यात अधिक चालना मिळणार आहे. शासनातर्फे रेवस रेड्डी सागरी मार्ग उभारण्यात येणार असून, हा मार्ग सागरकिनारी गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील गावे आणि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. रेवस रेड्डी सागरी मार्ग उभारण्याच्यादृष्टीने सध्या ठिकठिकाणी पूल उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे.
सागरी मार्गाची उभारणी करताना या मार्गावरील पर्यटकांची पसंती मिळालेल्या गावांमध्ये विकासकेंद्र उभारून शासनातर्फे तेथील पर्यटनाला अधिक चालना देण्यात येणार आहे. त्यात सागरी मार्गावरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १०५ गावांमधील १३ गावांमध्ये शासनातर्फे विकासकेंद्राची उभारणी केली आहे. त्याचा आराखडा एमएसआरडीसीतर्फे हाती घेण्यात आले आहे. १३ विकासकेंद्र उभारणी करण्यात येणाऱ्या गावांमध्ये तालुक्यातील सागरी किनारपट्टीवरील आंबोळगड गावाचा समावेश आहे. या विकासकेंद्राच्या माध्यमातून आंबोळगडसह सागरी किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण आंबोळगड परिसर – आंबोळगडला सर्वाधिक लांबीचा किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जांभ्या कातळाच्या पठारावर श्री गगनगिरी स्वामींचा मठ आहे. आंबोळगडसह या परिसरात प्रसिद्ध वेत्ये बीच, कशेळी बीच, आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली देवीचे मंदिर, कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर हेही पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू शकते; पण त्यासाठी या क्षेत्राचे मार्केटिंग होणे अपेक्षित आहे.