‘हे आमचं शेत… या आमच्या बागायती…. आणि हे धबधबे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत’ अशा निसर्गरम्य परिसरात पर्यटनावर आधारित उद्योगधंदे आणा, अशी मागणी करत जिल्हा पोलीस अधीक्षकांना गावात वाडीवस्तीवर फिरवत वाटद एमआयडीसीला आपला का विरोध आहे, हे ग्रामस्थांनी सांगितले. आमचं चांगलं आयुष्य चाललं आहे. आम्हाला एमआयडीसी नको, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे, असे प्रथमेश गवाणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी प्रस्तावित वाटद एमआयडीसी परिसराला भेट देत पहाणी केली. त्यानंतर जयगड पोलीस ठाण्यात ग्रामस्थांशी संवाद साधला. वाटद एमआयडीसी विरोधात काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी शनिवारी १९ जुलैला जनसंवाद सभा घेत मोर्चा काढला होता. या घटनेनंतर बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत जयगड पोलीस ठाण्यात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, जयगडचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील हे उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आमच्या सोबत गावात फिरले. त्यांनी शेती, बागायती आणि धबधबे पाहिले. पहिला आयपीएस अधिकारी ज्यांनी गावात येऊन आमच्याशी संवाद साधत प्रत्यक्ष पहाणी केली, अशी माहिती आंदोलकांच्यावतीने प्रथमेश गवाणकर यांनी पत्रकारांना दिली. ग्रामस्थांनी त्यांचे मुद्दे मांडले. आम्ही स्वतः प्रत्येक वाडीला भेट देत सरकारचे मुद्दे मांडले. विकासासाठी एमआयडीसी कशी आवश्यक आहे हे मुद्दे मांडले. गावागावात जाऊन लोकांची भेट घेतली, असे डीएसपी नितीन बगाटे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.