रत्नागिरी तालुक्यातील प्रस्तावित वाटद-खंडाळा एमआयडीसीविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी (ता. ११) या प्रकल्पासाठी जमीन मोजणी केली जाणार होती. मात्र, वाटद येथे शासकीय अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे मोजणी झालेली नाही. मात्र, त्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. वाटद-खंडाळा येथे उद्योगविभागामार्फत एमआयडीसीसाठी जागा संपादित केली जाणार आहे. मात्र, तिथे कोणता प्रकल्प येणार याबाबत अनिश्चितता आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून जमीन मोजणी करण्यात येणार होती.
याबाबत ग्रामस्थांना नोटिसी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मोजणीला विरोध करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून वाटद, खंडाळा, गडनरळ, मिरवणे आणि कळझोडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला कळझोडी येथे एकवटलेले होते. दुपारपर्यंत प्रतीक्षा केली, मात्र अधिकारी तिकडे फिरकलेच नाही. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची संख्या वाढत होती. प्रतीक्षा करूनही तिथे अधिकारी न आल्यामुळे दुपारनंतर ग्रामस्थ माघारी परतले. या प्रकारामुळे काही काळ वाटद परिसरात वातावरण तंग झाले होते.
दरम्यान, स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प करू नये, अशी भूमिका उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनाकडून किंवा उद्योग विभागाकडून केले गेले; तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी ‘आहे, असे प्रथमेश गावणकर, सहदेव वीर, नितीन वीर यांनी पत्रकारांना सांगितले.
हा प्रदूषणरहित प्रकल्प – वाटद येथे डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार असून, हा प्रदूषणरहित प्रकल्प आहे. तेथील शेतकऱ्यांचे काही गैरसमज असतील, तर ते दूर केले जातील. मला काही न सांगताच मोजणीसाठी भूसंपादनचे कर्मचारी गेले होते. त्यांना परत बोलावण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन झाल्यानंतरच त्याठिकाणी मोजणी होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले