जिल्ह्यातील विलवडे रेल्वे स्टेशन येथून पलायन करणारा चोरट्याला रिक्षा व्यावसायिक सुर्यकांत कानसे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे लांजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात यश आले. गुरुवारी सकाळी विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी ही घटना घडली.
रेल्वे मध्ये चोरी करणारा चोरटा गुरुवारी सकाळी विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरला होता. याबाबतची विस्तारित माहिती रत्नागिरी पोलिसांनी, विलवडे रेल्वे स्टेशन प्रमुख यांना दिली होती. त्यानुसार स्टेशन प्रमुख श्री.जाधव यांनी सदर चोरट्याला बसवून ठेवले होते. मात्र बाथरुमला जायचे खोटे कारण सांगून, तो रेल्वेच्या बाथरुम मध्ये गेला आणि तिथून त्याने पलायन केले. त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये जाऊन बसला. आणि रिक्षा चालकाला आपल्याला लांजाला जायचे आहे असे त्याने रिक्षा व्यावसायिक सुर्यकांत कानसे यांना सांगितले.
सदर चोरट्याला घेऊन लांजाकडे जात असताना त्यांना काही अंतरावर सहकारी रिक्षा व्यावसायिक तसेच रेल्वे स्टेशनचे स्थानक प्रमुख श्री जाधव यांचा कॉल आला की, आपल्या रिक्षातून प्रवास करणारी व्यक्ती ही चोर आहे. त्या व्यक्तीला तुम्ही परत घेऊन या असे सांगितले. मात्र रिक्षा परत वळविल्यास या चोरट्याला संशय येईल आणि तो पळून जाईल अशी शक्यता असल्याने रिक्षा व्यावसायिक सुर्यकांत कानसे यांनी प्रसंगावधान राखून आपली रिक्षा पुन्हा मागे न वळवता ती थेट लांजा पोलिस ठाण्यात आणली. तत्पूर्वी कॉल करून त्यांनी आपल्या लांजा येथील मित्रांना याबाबतची माहिती दिली होती. लांजा पोलीस ठाणे येथे आल्यानंतर संबंधित चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.