रत्नागिरी आणि कोल्हपुरला जाताना मध्यभागी लागणारा आंबा घाट, साधारण जुलै महिन्याच्या अखेर पासून अतिवृष्टी झाल्याने बंदच ठेवण्यात आला आहे. सध्या त्या मार्गावरून फक्त लहान वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे. अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला असला तरी, त्या मार्गाची सुद्धा वाताहत लागली असून, खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या आंबा घाटाची पहाणी केली. पहाणी करताना खासदार विनायक राऊत यांच्या समोर व्यापारी आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल रोष दर्शविला. आंबा घाटात अधिकारी फक्त दिखाऊपणा करतायत अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. आंबा घाट सुरु करण्यासाठी कुठलंही काम अधिकारी करत नसून केवळ दिखावा करतात. इथं केलेल काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. घाट पूर्ववत सुरु होण्यासंदर्भात अधिकारी कुठल्याच हालचाली करत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार राऊत यांनी रस्ता खचल्यामुळे अनेक दिवस अवजड वाहतुकीस बंद असलेल्या आंबा घाटाची पाहणी करून, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय हायवे अधिकाऱ्याकडून त्याबाबत आढावा घेतला. यावेळी ट्रक व्यवसायिक यांनी रस्ता लवकरात लवकर सुरू करावा अशी आग्रही मागणी केली. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वाहतुकीबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन राऊत यांनी दिले. त्याचप्रमाणे, एसटी वाहतूक आणि सहा टायर अवजड ट्रकची वाहतूक सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही खा. विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले.
यांच्या सोबत जिल्हाप्रमुख विलास चाळके, सह संपर्क प्रमुख राजू महाडिक ,माजी आमदार सुभाष बने, सभापती जया माने, जि. प.सदस्य रजनी चिंगळे, काका कोलते, शाहूवाडी मतदार संघाचे माजी आमदार सत्याजित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.