30.8 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

निवडणुकीसाठी २२३ एसटी बस आरक्षित….

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी...

नारायण तलावावर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर चिपळूण नगरपालिकेचा पुढाकार

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलाव परिसरात...

जगबुडी नदीकिनारा अस्वच्छतेच्या विळख्यात…

जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत...
HomeRatnagiriमिनी मंत्रालयासाठी जिल्ह्यात आज मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मिनी मंत्रालयासाठी जिल्ह्यात आज मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज

सोमवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १०.०० वाजता मतमोजणी सुरू होईल.

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होते आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि ९ पंचायत समित्यांच्या ११२ गणांसाठी शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार याचे उत्तर सोमवारी मतमोजणीनंतर मिळणार आहे. जिल्हयात भाजप-शिवसेना महायुती, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात प्रमुख लढत आहे. महायुतीच्या सत्तेत सामील असणारी अजितदादांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी स्वबळावर लढत आहे. तर दापोली-मंडणगड -खेड विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढते आहे. तेथे भाजप – आरपीआय आणि दादांची राष्ट्रवादी एकत्रित लढते आहे.

जि.प.साठी १५१ उमेदवार – जिल्हा परिषदेच्या ५६ गटांमध्ये एकूण १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ३२१ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती आहेत. काही ठिकाणी शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढती आहेत. तर रत्नागिरीतील हातखंबा जि.प. गटात शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.

धक्कादायक निकालांची अपेक्षा – दरम्यान निवडणूक प्रचारा पहायला मिळालेल्या वातावरणाचा विचार केला तर महायुतीचे वर्चस्व राहील असे बोलले जात असले तरी काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतातः त्यामुळे अंदाज वर्तविणे कठीण आहे.

अनेक दिग्गज रिंगणात – जिल्हयातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात गेली काही वर्षे सक्रिय असणाऱ्या अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या मतदारसंघात काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये अनेक जणांनी या आधी जि.प.चे अध्यक्षपद, सभापती पद भुषविलेले आहे. अशांमध्ये कसबा जि.प.गटातून लढणाऱ्या जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. रचना महाडिक, गुहागरमधील असगोली जि.प.गटातून लढत असलेले जि.प.चे माजी अध्यक्ष आणि उबाठाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, जि.प.चे आणखी एक माजी अध्यक्ष रोहन बने (कोसुंब), ज्येष्ठ सदस्य उदय बने (गोळप), जि.प.चे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, महेश नाटेकर, सहदेव बेटकर, माजी सभापती अण्णा कदम, प्रकाश रसाळ, चिपळूणच्या माजी सभापती आणि आमदार शेखर निकम यांच्या पत्नी सौ. पुजा निकम, माजी पालकमंत्री रविंद्र माने यांच्या पत्नी सौ. नेहा माने, शिवसेनेचे रत्नागिरी तालुका प्रमुख बाबु म्हाप, मुग्धा जागुष्टेट, नेत्रा ठाकूर, संगमेश्वर तालुका भाजपचे अध्यक्ष प्रमोद अधटराव, रत्नागिरी तालुका भाजपचे अध्यक्ष संयोग तथा दादा दळवी, माधवी गीते, हातखंबा जि.प.गटातून शिवसेनेच्या. अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी करणारे जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती पर्शुराम कदम आदी दिग्गज रिंगणात आहेत.

सर्वात ज्येष्ठ – सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले आणि या आधी तब्बल ५० वेळा निवडून आलेले उदय बने हे अपक्ष म्हणून गोळप जि.प. मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नंदा मुरकर लढत आहेत. गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांचे सुपुत्र, उबाठाचे उत्तर जिल्हाप्रमुख आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जि.प.चे माजी अध्यक्ष, माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते सुभाष बने यांचे सुपुत्र आणि जि.प.चे माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या लढतीकडे साऱ्या जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील फुट – मागील ३ निवडणुकांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेना भाजपची निर्विवाद सत्ता आहे. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर जिल्हा परिषदेची होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे कोण बाजी मारते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आज मतदान, सोमवारी निकाल – शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होईल. सोमवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १०.०० वाजता त्या त्या तालुक्यांच्या मुख्यालयात मतमोजणी सुरू होईल. दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हयाचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular