27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriरत्नागिरी वृद्धेची लुटमार करणारा निघाला बारमधील वेटर...

रत्नागिरी वृद्धेची लुटमार करणारा निघाला बारमधील वेटर…

खोली भाड्याने पाहिजे असा बहाणा करून ते जोडपे वृद्धेच्या घरात घुसले होते.

फ्लॅट भाड्याने पाहिजेत असे सांगून घरात घुसून वृद्ध महिलेच्या तोंडावर टॉवेल बांधून तिच्या अंगावरील १ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे दागिने लुटणाऱ्या रत्नागिरीतील एका बारमधील वेटरसह त्याच्या पत्नीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० ते स.९.१५ वा. दरम्यान घडली. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीत खळबळ उडाली होती. दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातून चोरट्याची टोळ्या शहरात सक्रिय झाल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसापूर्वी शहरात खासगी कार्यालये फोडण्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी असाच जबरी चोरीचा प्रकार घडला. त्या वृद्ध महिलेचा फ्लॅट हा भाड्याने द्यायचा होता. तशा आशयाचा बोर्ड तिने लावला होता. तो बोर्ड वाचून एक जोडपे त्या वृद्ध महिलेकडे गेले. शहरातील ऐन मध्यवस्तीत असलेल्या राधाकृष्ण टॉकीज परिसरात ती खोली होती. खोली भाड्याने पाहिजे असा बहाणा करून ते जोडपे वृद्धेच्या घरात घुसले होते.

७० वर्षाची वृद्ध महिला – रत्नागिरीत ऐन मध्यवस्तीत असलेल्या राधाकृष्ण टॉकीज परिसरात एक पुरुष आणि एक महिला सकाळी खोली भाड्याने मिळेल का विचारत वृद्ध महिलेच्या घरात घुसले. शहरातील राधाकृष्ण टॉकीज समोरील दत्त कॅफेच्या पाठीमागील बाजूला सुनंदा श्रीराम पटवर्धन (७०) या वृद्ध महिला एकट्याच राहतात. शुक्रवारी त्या बाजूला गेल्या होत्या. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. सुनंदा या परत आपल्या घरी येत असताना त्यांच्या पाठोपाठ एक जोडपे त्यांच्या घरात शिरले. तुमचे घर भाड्याने द्यायचे आहे का? अशी विचारणा केली. यावेळी त्यांच्या बोलाचाली झाली. मात्र तुम्हाला रूम मिळणार नाही असे सांगितल्यानंतर पुढे लुटीचा प्रसंग घडला.

दागिने लुटले – ते जोडपे माघारी परतत असतानाचा पुन्हा घरात गेले आणि सुनंदा यांच्या तोंडाला फडका बांधून त्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने बळजबरीने काढून घेतले. यावेळी सुनंदा यांनी प्रतिकार केला. मात्र त्यांचा निभाव लागला नाही. या झटापटीत वृद्धेच्या हातातील एक बांगडी त्यांना काढता आली नाही मात्र झटापटीत जेवढे मिळाले तेवढे सोनं काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला. हा प्रकार घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. एका वृद्धेला लुटल्याने शहरात खळबळ उडाली होती.

बारमध्ये वेटर – ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची एक टीम तपासकामाला लागली होती. परिसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये वृद्धेला लुटणारे जोडपे दिसून आले. त्यानंतर या साऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार वृद्धेला लुटणाऱ्या जोडप्यामध्ये शेखर रमेश तळवडेकर, सध्या रा. लक्ष्मी चौक, मूळ रा.तळवडे, सिंधुदुर्ग हा त्याच परिसरातील एका बिअर बारमध्ये वेटर म्हणून कामाला होता.

तो व त्याची पत्नी आश्लेषा शेखर तळवडेकर हे दोघेही सी. सी. टी. व्ही. त कैद झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासात दोघांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सपोनि तानाजी पवार, पो. हे. कॉ. विजय आंबेरकर, पो. हे. कॉ. योगेश नार्वेकर, पो. हे. कॉ. दिपराज पाटील, पो. हे. कॉ. विवेक रसाळ, मपोहेकॉ वैदेही कदम, पोना दत्तात्रय कांबळे आदींनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular