26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriवाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने

वाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने

१ हजार एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली असून, त्या एमआयडीसीत संरक्षण विभागाचा सुमारे १० हजार कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे येऊ घातला आहे. या प्रकल्पामुळे हजारो स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी १ हजार एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाटद मिरवणे, निवे, कोळीसरे, कळझोंडी आदी पाच गावांतील जमीन संपादित केली जात आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नुकतीच हरकतींवर सुनावणी झाली. यामध्येही बहुतांशी गावांनी प्रकल्पाला पाठिंबा दिला. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी देखील याबाबत स्थानिकांचे प्रबोधन केले. उद्योगपती अनिल अंबानी यांचा संरक्षण विभागाचा धीरूभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून स्फोटके, दारूगोळा, शस्त्र (बंदुका) तयार केल्या जाणार आहेत.

प्रकल्पाविरोधात काही गावांचा मोर्चा – वाटद पंचक्रोशीतील काही गावांनी वाटद एमआयडीसीला विरोध केला. काही गावांनी जमीन मोजणी देखील बंद पाडली होती; परंतु पोलिस संरक्षणात जमीन मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वाटद संघर्ष समिती स्थापन झाल्या. या समित्यांनी वाटद एमआयडीसीविरूद्ध आंदोलन केले. काही दिवसांपूर्वीच या एमआयडीसीविरोधात मोर्चा काढण्यात आला. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे संविधान विश्लेषक वकील असीम सरोदे आले होते. प्रथमेश गवाणकर यांनी पुढाकार घेऊन या एमआयडीसीला विरोध दर्शवला. ही एमआयडीसी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला.

११४ हरकतींवर सुनावणी पूर्ण – वाटद एमआयडीसीसाठी सुमारे साडेनऊशे हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मोजणी पूर्ण झाली असून, यावर स्थानिकांच्या हरकती मागवण्यात आल्या. यावर ११४ हरकती आल्या होत्या. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्या निकाली काढल्या. पंचक्रोशीपैकी काही ठराविक लोकांचा एमआयडीसीला विरोध असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे आठवडाभर सुनावणीची प्रक्रिया सुरू होती.

प्रकल्पाच्या बाजूने शक्तिप्रदर्शन – या प्रकल्पाला पाठिंबा असणाऱ्या स्थानिक शेतकरी, जमीनमालक आणि व्यापाऱ्यांनी वाटदमध्ये येणाऱ्या संरक्षण विभागाच्या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वाटद संघर्ष समितीविरोधात समर्थनार्थ बैठक बोलावली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांना बोलावण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांच्या पुढाकारातून हा बैठक घेण्यात आली. शेतकरी, जमिनमालक, व्यापाऱ्यांची प्रबोधन सभा आयोजित केली. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी करून वाटद एमआयडीसीला पाठिंबा असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या विरोधापेक्षा त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी चांगलेच शक्तिप्रदर्शन केले.

मेळाव्यात सामंतांची भावनिक साद – पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये होणार, याचा अभिमान असायला हवा. रोजगार नसल्याने ४० टक्के घरे बंद आहेत. आपली मुलं आपल्या आई-वडिलांसमोर नोकरी करावीत यासाठीही हा प्रकल्प आणतोय. देशाच्या ज्या सैन्याबद्दल आपल्याला अभिमान आहे त्यांच्यासाठी शस्त्र बनवणारा हा कारखाना आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैन्याच्या हातात जी बंदूक असेल ती वाटद येथील कारखान्यातील असेल, असे सांगत सामंतांनी भावनेला हात घातला.

एक हजार एकर जमीन का ? – वाटद एमआयडीसीसाठी सुमारे एक हजार एकर जमीन संपादित केली जात आहे. प्रकल्प जर ३०० एकरमध्ये होणार आहे तर मग हजार एकर जमीन कशासाठी, असा अनेकांना प्रश्न पडला होता. तो देखील सामंत यांनी दूर केला. १ हजार एकर जमीन का घेतली? कारण, ३०० एकरमध्ये प्रकल्प होणार आहे. उर्वरित बफर झोन हा प्रकल्पाच्या सुरक्षेच्यादृष्टीने असले. ही जमीन एमआयडीसी नाही तर कंपनीच्या पैशाने घेणार आहे, असे स्पष्ट केले.

स्थलांतरामुळे ४० टक्के चौथरे ओस – वाटद पंचक्रोशीतील अनेक तरुण, सुशिक्षित बेकार रोजगारानिमित्त मुंबई, पुणे आदी ठिकाणी गेले आहेत. त्यांनी शहरांचा रस्ता धरल्यामुळे काही महिने नोकरीच्या ठिकाणी राहिल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घेऊन जात आहेत. शेती होत नाही, घरे ओस पडू लागली आहेत. फक्त गणपती, शिमग्यापुरतीच घरे उघडत आहेत. तरुणांच्या हाताला याच ठिकाणी रोजगार हवा असेल तर प्रदूषणमुक्त कारखान्यांसाठी स्थानिकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन प्रकल्प समर्थकांनी केले आहे.

दशक्रोशीतील सरपंचांचे पाठिंब्याचे पत्र – वाटद येथील संरक्षण विभागाच्या शस्त्र कारखान्याला पाठिंबा देण्यासाठी दशक्रोशीतील अनेक सरपंचांनी एमआयडीसीला पाठिंबा पत्र दिले असून, समाज संघटनांनीही पाठिंब्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रकल्प आल्यास परिसराचा विकास होणार असल्याची ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular