तालुक्यातील वाटद एमआयडीसीमध्ये स्टील प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी नुकतीच वाटद येथील शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीबरोबर बैठक झाली; मात्र वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द व्हावी, या मागणीवर संघर्ष समिती ठाम असल्याने पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी जागा शोधण्याची वेळ एमआयडीसीवर येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील वाटद एमआयडीसीला सुरुवातीपासूनच विरोध होता. वाटद, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, कोळीसरे या ग्रामपंचायतींनी एमआयडीसी १०० टक्के रद्द व्हावी, असा ठराव केला आहे. या ठरावाच्या प्रती निवेदनाबरोबर संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. ९७८ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी घेतली जाणार आहे; मात्र याबाबत स्थानिकांचे अनेक आक्षेप होते.
जनसुनावणी न घेता या ठिकाणी जमीन अधिग्रहणाच्या नोटीस शेतकऱ्यांना काढल्या आहेत. एमआयडीसीकडून नोटीस बजावण्यापूर्वीच पुन्हा एकदा या ठिकाणी ३० ते ४० टक्के परप्रांतीय लोकांनी जमीन अधिग्रहण केली आहे. वाटद एमआयडीसीची अधिसूचनाच रद्द व्हावी, या मागणीवर स्थानिक ठाम आहेत. उद्योगमंत्री आपल्या तालुक्यातील असल्याने तालुक्यात रोजगार निर्मिता, आर्थिक सुबत्तेच्यादृष्टीने मोठा प्रकल्प येणे गरजेचे आहे. मोठा स्टील प्रकल्प रत्नागिरीत प्रस्तावित आहे. त्यासाठी एमआयडीसीकडे मोठी जागा नसल्याने वाटद एमआयडीसीकडे त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने पाहिले जात आहे. त्याला काही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला; परंतु प्रत्यक्षात उद्योगमंत्र्यांनी त्यासाठी वाटद येथील संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याने या हालचालींवर शिक्कामोर्तब झाला आहे; परंतु स्थानिकांचा विरोध कायम आहे.