रत्नागिरी शहरालगत असलेल्या जे. के. फाईल्स कंपनीला घरघर लागली आहे. सातपैकी तीन विभाग बंद करण्यात आले आहेत. शुक्रवारी संचालक मंडळाने रत्नागिरीत येऊन कामगारांना ७ लाख रुपये व अन्य योजनांचा फायदा देण्याचे आमिष दाखवल्याने कामगारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. कंपनी बंद झाल्यास कायमस्वरूपी असलेले सुमारे ३०० हून अधिक कर्मचारी बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यावर काय करणार याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीमध्ये सुमारे ४५ वर्षांपूर्वी १९७८ मध्ये जे. के. फाईल्स इंजिनिअरिंग ही कंपनी सुरू झाली.
मिऱ्या-नागपूर हायवेलगत असणाऱ्या या कंपनीत रत्नागिरीतील शेकडो कामगार असून, त्यावर त्यांनी संसार उभा केला आहे. आजही सुमारे तीनशे ते चारशे कामगार कायमस्वरूपी या ठिकाणी कामाला आहेत. या कंपनीमध्ये पूर्वी सात डिपार्टमेंटमध्ये काम चालत होते. फाईल्स तयार करण्याचे काम त्यानंतर मिरजोळे एमआयडीसीत अन्य ठिकाणी देण्यात येत होते. कालांतराने रत्नागिरीत बाहेर देण्यात येणारी काम बंद झाली; परंतु रत्नागिरीतील कंपनीमध्ये असणाऱ्या ठेकेदारांचे कामगारही हळूहळू कमी करण्यात येऊ लागले. मालाला उठाव नसल्याचे कारण देत संचालक मंडळाने कामही कमी केले. याचवेळी चिपळूण खडपोलीतील कामे मात्र वाढली होती. सध्या रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीत असणाऱ्या फोर्जिंग, ग्रेडिंग, कटिंग, हार्डिंग, निडल, वेअर हाऊस, पॅकिंग यातील निडल, वेअर हाऊस, पॅकिंग ही डिपार्टमेंट बंद करण्यात आली आहेत.
येथील कामगारांना फोर्जिंग, ग्रॅडिंग, कटिंग व हार्डिंग डिपार्टमेंटमध्ये हलवण्यात आले आहे. तीन शिफ्टमध्ये चालणारे या कंपनीतील काम सध्या सकाळच्या एकाच शिफ्टमध्ये सुरू ठेवण्यात आले आहे. कंपनी बंद करण्याच्यादृष्टीने संचालक मंडळ पावले टाकत असल्याचे दिसते. या ठिकाणी अधिकृत कामगार संघटना असलेल्या मजदूर युनियनने मुख्यमंत्री, उद्योगमंत्री अगदी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. गुरुवारी युनियनचे संजय वढावकर यांनी कामगारांची भेट घेऊन कंपनी बंद पडू देणार नाही, असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला; परंतु कंपनी बंद करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.