तालुक्यात मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कोदवली आणि अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असून दोन्ही नद्यांनी पात्र सोडून राजापुरात प्रवेश केला आहे. शहरातील मच्छीमार्केट परिसरासह वरचीपेठ रस्ता, शिवाजी पथ रस्ता, गणेशघाट परिसर पाण्याखाली गेला आहे तर, आंबेवाडी परिसरामध्ये नदीपात्रातील पाणी रस्त्यावर आले आहे. जवाहर चौकातील कोदवली नदीच्या काठावरील टपऱ्यांच्या शेजारी पाणी वाढले आहे. अर्जुना-कोदवली नद्यांनी धोक्याची गाठलेली पातळी आणि पाण्यामध्ये सातत्याने वाढ झाल्याने या वर्षी प्रथमच राजापुरात पूर आला आहे.
प्रांताधिकारी वैशाली माने आणि रूगी तहसीलदार शीतल जाधव यांनी प्रशासनाला संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवसभर जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या अर्जुना कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. मच्छीमार्केट येथून वरचीपेठ भागामध्ये जाणारा रस्ता, नवजीवन हायस्कूलच्या मागचा परिसर, गणेशघाट परिसर पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या भागातून शीळ, गोठणे दोनिवडे भागामध्ये होणारी वाहतूक दुपारनंतर ठप्प झाली. कोदवली नदीच्या काठावरील जवाहर चौकातील छोट्या टपऱ्यांपर्यंत पाणी वाढले आहे.
आंबेवाडी परिसरामध्ये नदीचे वाढलेले पाणी रस्त्यावर आले असून गणेश घाट परिसरातही वाढलेल्या पाण्याने धडक दिली आहे. शिवाजी पथ रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, सातत्याने सरींवर बरसणारा पाऊस आणि नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ झाल्याने सायंकाळी सहा वाजता राजापूर बाजारपेठेत पाणी घुसले. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह शहरवासीय नद्यांच्या काठांवरील गावांमधील ग्रामस्थ अधिक सतर्क झाले आहे.दरम्यान, कालच्या तुलनेमध्ये आज दुप्पट म्हणजे सरासरी ८९ मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत तालुक्यामध्ये १ हजार २३६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.