गेल्या ४ दिवसांपासून कोसळणाऱ्या धो धो पावसाने मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण उडविली आहे. मंगळवारी सलग चौथ्या दिवशी मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. रस्त्यावर साचलेल्या कंबरे इतक्या पाण्यातून मार्ग काढणाऱ्या मुंबईकरांना लोकल ट्रेननेही फटका दिल्याने जनजीवन पूर्णतः कोलमडले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने मुंबईकरांच्या पोटात भीतीचा गोळा उमटला असून काही वर्षांपूर्वी २६ जुलैला झालेल्या जलप्रलयाच्या आठवणींनी अनेकांच्या उरात धडकी भरली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी ऑगस्टपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला आणि सोमवारी मुंबईची तुंबई झाली. सोमवारी दिवसभर हिंदमाता, सायन, दादर, प्रभादेवी, भांडुप, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, गोवंडी आदी अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने त्यातून मार्ग काढताना मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. सोमवारी सायंकाळपर्यंत महापालिकेने अनेक भागांत साचलेले पाणी पंपिंगच्या माध्यमातून रिकामे केले. त्यामुळे सायंकाळी मुंबईकरांनी सुटकेचा निः श्वास टाकला खरा. परंतु सोमवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी पहाटेपासून मुंबई पुन्हा तुंबली.
अनेक भागांत पाणी – मंगळवारी देखील मुंबईच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढताना चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. परिस्थितीचा अंदाज घेऊन सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र तोवर कामावर जाण्यासाठी अनेक मंडळी घरातून बाहेर पडली होती. त्यामुळे सुट्टीचा फारसा उपयोग हा त्रास थांबविण्यास झाला नाही.
मिठीने पातळी ओलांडली – मंगळवारी पुन्हा शहराला पाण्याने वेढा दिला होता. मिठी नदीने इशारा पातळी ओलांडली होती. नालेसफाईची पोलखोल झाल्याने आधीच महानगरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले असतानाच मुंबईच्या मिठी नंदीचे पाणीदेखील घुसल्याने अवघ्या मुंबापुरीची तुंबापुरी झाल्याचे चित्र दिसले. अनेक भागांमध्ये कंबरेपर्यंत आलेल्या पाण्यातून मार्ग काढताना चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि ती मंगळवारी दुपारपर्यंत ३.९० मीटरपर्यंत पोहोचली होती.
लोकलसेवा बंद – मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी रेल्वेची लोकलसेवा सकाळी १.१.३० वाजल्यापासून काही काळ बंद पडली होती. त्यामुळे अनेक मुंबईकर अडकून पडले. परत घरी जावे की कार्यालयात पोहोचावे. अशा संभ्रम ात असलेल्या अनेक मंडळींनी थेट रेल्वे सोडून टॅक्सी आणि रिक्षाच्या साहाय्याने दरमजल करत घर गाठले.
रेल्वे रूळांवर पाणी – अनेक रेल्वेस्थानकांमध्ये देखील पाणी होते. रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्याने मध्य रेल्वेसह हार्बर लाईनही बंद पडली. वडाळा, शिवडीजवळ रूळावर पाणी साचल्याने गाड्या विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या कुर्ला-सायनदरम्यान अप फास्ट आणि डाऊन दोन्ही लोकल सकाळी ११.३० वा. च्या सुमारास बंद पडल्या. खबरदारीचा उपाय म्हणून ११.४५ वाजल्यापासून स्लो लोकल घावत होत्या. मात्र त्या पुरेशा न ठरल्याने हजारी मुंबईकर लोकलच्या प्रतिक्षेत स्थानकांवर ताटकळत होते. रेल्वे स्थानक आणि रूळांवर आलेले पाणी पंपिंगच्या साहाय्याने दूर करण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले मात्र ते अपुरे ठरले. कारण धो धो पाऊस कोसळतच होता.
मस्जिद बंदर पाण्याखाली – मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेले होते. अंधेरी सबवे देखील पाण्याखाली होता. ‘म स्जिद बंदर रेल्वेस्टेशनवर खूप पाणी स्नाचले होते. त्याचप्रमाणे माटुंगा येथेही रूळावर पाण्याचे साम्राज्य होते. कुर्ला, सायन, वाशी, चेंबूर, नेरुळ, ठाणे, ऐरोली आदी अनेक भाँगांत रेल्वेस्थानकांवर पाणी साचले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
वादळी वारे – आभाळ फाटल्यागत धो धो पाऊस पडत असतानाच वरळी सी-लिंकवर वादळसदृश्य वातावरण होते. जोरदार वारे वाहत असल्याने आता वादळही तडाखा देणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती.
अतिवृष्टीची नोंद – मुंबई आणि उपनगरात मागील २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. विक्रोळी परिसरात सर्वाधिक १५५. मिमी. पाऊस पडल्याची नोंद असल्याची माहिती मंगळवारी सकाळी हवामान विभागाने दिलेल्या अपडेटच्या माध्यमातून हाती आली आहे. भासखळा, सांताक्रुझ, जुहू, वांद्रे परिसरातदेखील १०० मिमी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीत १५५ मिमी., सांताक्रुझमध्ये ९४.८ मिमी, जुहूमध्ये ५७ मिमी., वांद्रे येथे ४५ मिमी., भायखळा ३७ मिमी., कुलाबा १३.८ मिमी. पाऊस कोसळला.
पोटात भीतीचा गोळा – मंगळवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाशी संघर्ष सुरू असतानाच मुंबईत पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्यांचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने चाकरमान्यांच्या पोटात भीतीचा गोळा उमटला होता. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता खरी ठरताना दिसत होती.