बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोपडून काढले. त्यामुळे काजळी नदीचे पाणीही इशारा पातळीच्या जवळपास वहात होता. तालुक्यातील कोतवडे येथे वहाळाचे पाणी दोन घरात घुसल्याने तेथील व्यक्तींना शेजारी स्थलांतरीत करण्यात आले तर हरचिरी बौध्दवाडी येथे डोंगराला भेगा गेलेल्या असल्याने १३ कुटुंबियांना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यातील हरचिरी बौध्दवाडी येथे मागील दोन वर्षापासून डोंगराला भेगा जात असून काही घरांनाही तडे गेले आहेत. दोन वर्ष मोठा पाऊस आला की स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या जात असतात.
मागील दोन दिवस तालुक्यात पाऊस पडत असल्याने हरचिरी बौध्दवाडीतील १३ कुटुंबियांना स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. तहसीलदार म्हात्रे यांनी या भागात नुकतीच पाहणी केली व तलाठी नाईक यांना सूचना दिल्या आहेत. येथील शाळा व ग्रामपंचायतीमध्ये तात्पूरते स्थलांतर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी करुन ठेवली आहे. मंगळवारी रात्रीपासूनच तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी दिवसभर पावसाने सातत्य राखले आहे. कोतवडे येथे नदीला बंधारा घालण्यात आला आहे. या ठिकाणी येऊन मिळणाऱ्या वहाळाला पाणी फुगले होते.
वहाळाजवळ असणाऱ्या दोन घरात पाणी घुसले. येथील चारजणांना शेजारीच स्थलांतरीत केले आहे. पाणी कमी झाल्यानंतर येथील रहिवासी आपल्या घरी जाणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले. त्यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि रहिवाशांशी चर्चा केली. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचून राहिले होते. याचा फटका मारुती मंदिर येथील भाजी मार्केटला बसला.
या मार्गावर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांचे मोठे हाल झाले. गटार व्यवस्था योग्य नसल्यानेच हा प्रकार झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. माळनाका येथील विरंगुळा एसटी विश्रामगृहाशेजारीही एसटी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर थेट गटारामधून पाणी बाहेर येत होते. शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरचे पाणी गटारात जाण्याऐवजी गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याचे प्रकार पहायला मिळत होते.