संगमेश्वर तालुक्यातील तेलीवाडी तलावाला भगदाड पडल्याने गेली दोन वर्षे उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असणाऱ्या दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी पुणे येथील चार वरिष्ठ वैज्ञानिकांच्या पथकाने या धरणाची पाहणी केली असता या धरणाला भलेमोठे भगदाड पडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या धरणात पाणीसाठा करणे धोक्याचे असल्याचे स्पष्ट मत त्या पथकाने सांगितले होते. त्यामुळे यावर्षी ५० टक्के पाणीसाठा कमी करण्यात आला होता. या प्रादेशिक योजनेवर दहा गावे अवलंबून आहेत; मात्र मार्च महिना सुरू होत असतानाच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण देत एक दिवसाआड पाणी सोडण्यास सुरुवात झाली. याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याविना हाल सुरू झाले आहेत. आठवड्यातील एक दिवस सोमवारी पाणी येत नाही, मंगळवारी पाणी येईल, या आशेवर महिला, ग्रामस्थ होते; मात्र मंगळवारी पाणी आले नाही त्यामुळे घरातील पाणी संपल्याने महिलांना वणवण करावी लागली.
वास्तविक एक दिवसाआड पाणी मिळेल, अशी सूचना ग्रामस्थांना देणे अथवा ग्रामपंचायत कार्यालयाला कळविण्याचे कष्ट संबंधितांनी घेतले नाहीत. ग्रामसेवक ना ग्रामस्थांचा फोन घेत ना सरपंचांचा. गटविकास अधिकारी यांना अनेकवेळा पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नियोजनाची बैठक लावा म्हणून येथील ग्रामस्थ सत्यवान विचारे यांनी कळवले होते; पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, उंबरे धरणावर अवलंबून असलेल्या दहा गावातील ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अधिक गंभीर होत जाणार असल्याने पुढील साडेतीन महिने पाण्यावाचून कसे काढायचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तातडीने उपाययोजना कराव्यात – उन्हाळ्यातील मार्च एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या पाणी टंचाईचा विचार करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा लोकप्रतिनींधीनी करावा अशी अपेक्षा भागातील ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.