गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जलमागनि प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. मुंबईहून मालवण, रत्नागिरी आणि विजयदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या रो रो बोट सेवेची चाचणी अंतिम टप्प्यात आहेच. लवकरच ही सेवा प्रत्यक्षात येणार असून, मुंबईतून अवघ्या साडेचार तासांत सिंधुदुर्ग जिल्हा गाठता येणार आहे. राज्य सरकारच्या मत्स्य व बंदर विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली सागरी महामंडळ आणि एमटूएम कंपनी यांच्यातील करारानुसार ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. भाऊचा धक्का येथील जहाज स्थानकावर ही अत्याधुनिक रो-रो बोट दाखल झाली असून, पहिल्या टप्प्यात मुंबई ते मांडवादरम्यान यशस्वी चाचणी झाली आहे. आता पुढील काही दिवसांत रो-रो सेवेच्या चाचण्या रत्नागिरी, विजयदुर्ग आणि मालवण या तीन प्रमुख बंदरांवर घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर बोट चालविण्याचा परवाना मिळेल आणि गणेशोत्सवाच्या आधीच नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाहनेही नेता येणार – रो रो बोटीतून प्रवाशांबरोबरच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूकही करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कोकणात खासगी वाहनही घेऊन जाता येणार आहे. वाहनांसह जलमार्गे प्रवास केल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि रखडलेल्या रस्त्यांच्या समस्यांपासून सुटका होणार आहे.
रत्नागिरीत तीन तासांत – मुंबईतील जहाज स्थानकावर निघाल्यानंतर अवघ्या तीन तासांत रत्नागिरी, तर साडेचार तासांत विजयदुर्ग आणि मालवण गाठता येणार आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.
कोणत्या सुविधा – वातानुकूलित विश्रांतीगृह, सुरक्षा सुविधा, शौचालय व्यवस्था, आपत्कालीन बचाव उपकरणे, सीसीटीव्ही, डिजिटल तिकीट अशा सर्व अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.
पावसाळ्यातही सेवा शक्य – रो-रो बोटीमुळे पावसाळ्यातही कोकणाकडे जलवाहतूक शक्य झाली आहे. सागरी महामंडळाने यासाठी विशेष नियोजन केले असून हवामानानुसार सेवा राबवली जाणार आहे. मुंबईतील जहाज स्थानकावर निघाल्यानंतर अवघ्या तीन तासांत रत्नागिरी, तर साडेचार तासांत विजयदुर्ग आणि मालवण गाठता येणार आहे.