खिणगिणी पंचक्रोशीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आंबा व काजू बागायतींची लागवड केलेली आहे. त्या बागायतींना हंगामातील प्रतिकूल स्थिती आणि अवकाळीचा तडाखा बसून शेतकरी, बागायतदार यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. मात्र, त्या नुकसानीची पीक विमांतर्गत नुकसानभरपाई मिळताना तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे खिणगिणी गावामध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आल्याची माहिती प्रशासक प्रभाकर आपटे यांनी दिली. हवामान केंद्र उभारणीसाठी आवश्यक असलेली शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले. तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचेही या वेळी निश्चित करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील खिणगिणी ग्रामपंचायतीचे प्रशासक आपटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. या सभेला विजय पाध्ये, अशोक डोंगरकर, मनोज कदम, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासक आपटे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांसह प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यावर ग्रामस्थांनी सविस्तर चर्चा करताना गावविकासाचे विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार केला. गेल्या काही वर्षांमध्ये हवामानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलावांचा आंबा, काजू बागायतींना फटका बसून बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या प्रतिकूल स्थितीमध्ये बागायतींसह पिकांना संरक्षण मिळावे म्हणून पीक विमाही उतरविण्यात येत आहे.
मात्र, काही तांत्रिक कारणास्तव या भागातील बागायतदारांना नुकसान होऊनही पीक विम्याचा लाभमिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागामध्ये हवामान केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. महसूल रेकॉर्डला नोंदी नसलेले गावातील रस्ते, पाणंद यांची महसूल रेकॉर्डला नोंदी करणे, विधवा अनिष्ट प्रथा बंद करणे आदी निर्णयही या वेळी घेण्यात आले. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गावामध्ये लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. शासनाच्या विविध योजना गावामध्ये राबवून त्यामध्ये गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आल्याची माहिती आपटे यांनी दिली.