कोरोना काळामध्ये पूर्णपणे बंद असलेला पर्यटन व्यवसाय हळू हळू पूर्ववत येऊ लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले होते, पण आता ते शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणासह अनेक भागांमध्ये पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे.
काही ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे उत्साहात स्वागत केले जात आहे. आणि कोरोनाच्या नियमांबद्दल सतर्कही राहण्यास सांगितले जात आहे. दापोली तालुक्यामध्ये पुन्हा पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. या पर्यटकांचे स्वागत करताना दापोली पोलिसांनी फुले देऊन केले आहे.
कोरोना अद्याप समूळ नष्ट झाला नसून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटा, मात्र, कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. दापोलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे आणि पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दापोली येथे आलेल्या पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले. पोलिसांकडून झालेल्या अनपेक्षित स्वागताने पर्यटकही भारावून गेले. पर्यटकांनी पोलिसांनी केलेल्या वेलकमचा आनंदाने स्वीकार केला.
जागतिक पर्यटन दिन मागच्या आठवड्यात झाला. त्याचे औचित्य साधून मुंबई, पुणे येथील तसेच राज्यभरातून येणाऱ्या अनेक पर्यटकांचे दापोलीतील बुरोंडी नाका चेकपोस्टवर दापोली पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पर्यटकांनी पर्यटन करताना कोणती काळजी, खबरदारी घ्यावी याचे देखील सुयोग्य मार्गदर्शन करण्यात आले.
कोकणातील भौगोलिक परिस्थितीची माहिती देऊन वाहन चालविताना दक्षता घेण्याच्या सूचना देऊन कोणतीही अडचण आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. पर्यटनाचा आनंद लुटत असताना कायदा सुव्यवस्था तसेच स्थानिक चालीरीतींचे भान राखण्याचे, कोणत्याही कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.