आंबा बागायतदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा व व्याजामध्ये सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्या संबंधी कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच केली जाईल तसेच कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा रत्नागिरीत उभारण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्या. रत्नागिरी यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत सामंत म्हणाले, आंबा बागायतदारांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे.
आंबा बागायतदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा व व्याजामध्ये सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्या संबंधी कार्यवाही करण्यात यावी. बँकांनी सिबिल स्कोअर विचारात न घेता आंबा बागायतदारांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच विविध योजनांचे लाभार्थी बँकेमध्ये येत असतात त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. याबाबत सर्व बँकांना अग्रणी बँकेने आदेश द्यावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. वानर व माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे पुरवण्यात आले आहेत. आंबा वाहतुकीसाठी सिंधुरत्न योजनेमार्फत सबसिडी देण्यात येणार असून, सप्टेंबर अखेरपर्यंत गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.
सिंधुरत्न योजनेतून शेतकऱ्यांना कमी दरांमध्ये फवारणीसाठी औषधे, खते, अवजारे उपलब्ध करून दिली जातील. बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा लवकरच रत्नागिरी येथे उभारण्यात येणार असून, त्याकरिता सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, उपसरव्यवस्थापक कृषी पणन मंडळ मिलिंद जोशी, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते.
पुन्हा बैठक घेणार – बुधवारी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन आंबा बागायतदारांसाठी कर्जमाफी व व्याजामध्ये सूट मिळण्याकरिता तयार येणाऱ्या करण्यात प्रस्तावाबाबत आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी बैठकीच्या वेळी सांगितले.