जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर फसलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला मंगळवारी रात्री तब्बल ४२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात सोडण्यात बचाव पथक आणि ग्रामस्थ व पर्यटकांना यश आले खरे मात्र बुधवारी सायंकाळी हा मासा पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावर लागला. त्यावेळी तो मृत पावला असल्याने जवळपास गेले दोन दिवस त्याला सुखरुपपणे पाण्यात सोडण्यासाठी राबविलेले रेस्क्यू ऑपरेशन अखेर फेल गेले. सोमवारी (१३ नोव्हेंबर) समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल मासा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आल्याचं पर्यटकांनी पाहिलं. तसंच, बोट क्लबच्या सदस्यांनाही हा व्हेल मासा दिसला. त्यामुळे त्यांनी तातडीने पावलं उचलत त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, महाकाय व्हेल माशाचं पिल्लू वाळूत रुतून बसलं होतं.
सहाटन वजनाचे पिल्ल – सोमवारपासून पर्यटक, स्थानिक नागरिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीव रक्षक यांच्या मदतीने या माशाला समुद्रामध्ये सोडण्याचे प्रयत्न केले जात होते. वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतके या माशाचे वजन होते. दरम्यान ओहोटी असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे आले. सोमवारी रात्रभर हे बचावकार्य सुरू होते.
दोरीनं बांधल आणि… – रात्री ओहोटीच्या वेळा या माशाला दोरीने बांधलं आणि बोटीने ओढून खोल समुद्रात नेण्यात आलं. अखेर, ४० तासांहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर या व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यात आलं आहे. यामुळे ग्रामस्थांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अनेकांची मदत – तब्बल ४० तासाहून अधिक काळ ही बचाव मोहिम राबविण्यात आली यामध्ये वनविभाग, गणपतीपुळे ग्रामपंचायत, स्थानिक पोलिस प्रशासन, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, महसुल विभाग, एमटीडीसी महामंडळ, बोट क्लब गणपतीपुळे, जिंदल कंपनी वाईल्ड लाईफ पुणे रेस्क्यु टिम यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी ही मोहिम राबविली.
पुण्याहून आली टीम – ५-६ महिन्याचे हे पिल्ल होते. ३० फूट लांब आणि ३ टनापेक्षा अधिक वजन असलेल्या या पिल्लाला समुद्रात सुखरूपपणे सोडणे हे एक मोठे आव्हान होते. सोमवार सकाळपासूनच त्याला समुद्रात सोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्याला तीन वेळा समुद्राच्या पाण्यात ढकलण्यात आले मात्र तीन्ही वेळा ते बाहेर आले. त्याम ुळे खोल समुद्रात जाण्याचे त्राणदेखील त्या व्हेल माशामध्ये नसावेत हे लक्षात घेवून त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी पुण्याहून वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम बोलावण्यात आली.
औषधोपचार केले – या टीमने या पिल्लाला ८ सलाईन्स, ३ अन्टीबायोटीक इंजेक्शन दिली तेव्हा त्याला तरतरी आली. मात्र त्यावेळी भरतीची वेळ नव्हती. त्यामुळे त्याला समुद्रात सोडणे शक्य नव्हते. तोपर्यंत त्याला जिवंत ठेवण्यासाठी पाणी पुरविण्यात येत होते. एमटीडीसीचे कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे जिवरक्षक समुद्राच्या पाण्याचा मारा त्याच्यावर करत होते. पुण्यातील टीमने उपचार केल्या नंतर त्या माशाला जिवदान मिळाले.
मध्यरात्री समुद्रात सोडले – मंगळवारी रात्री वाजण्याच्या सुमारास ११.३० सुमारास जिंदलच्या जहाजाने (टग) व तटरक्षक दलाच्या बोटीने या माशाच्या पिल्लाला सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मात्र मोहीम फेल – मंगळवारी रात्री सुखरुपपणे या माशाला समुद्रात सोडण्यात आले खरे, मात्र बुधवारी सायंकाळी हा मासा पुन्हा एकदा किनाऱ्यावर लागला. तो मैलेला होता. जगण्याइतपत शक्ती त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे तो मृत पावला आणि ४० तासाहून अधिक काळ त्याला सुखरुपपणे पाण्यात सोडण्याची मोहीम अखेर फेल ठरली.