गेले अनेक महिने परदेशामध्ये व्हेल माशाच्या उलटीला मिळणारी किंमत पाहून डोळे चक्रावून जायला होते. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी व्हेल माशाची उलटी विक्रीचे प्रकार घडल्याची अनेक प्रकरणे कानावर येत आहेत. व्हेल माशाच्या उलटीचे मूल्य कोट्यावधी रुपयांमध्ये असते. तसेच व्हेल माशाच्या उलटीचा वापर अनेक सुगंधित अत्तर, काही औषधे, उच्च प्रतीची सिगारेट, मद्य, काही खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कितीही किंमत असली तरी तिला मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
६ जुलै रोजी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला रत्नागिरी येथून दुचाकीवरून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी माणगाव लोणेरे येथे एक व्यक्ती घेऊन येणार असल्याची खबर हेराकडून मिळाली. पोलिसांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकून त्या व्यक्तीस लोणेरे येथे अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.
सदर प्रकरणी गोरेगाव पोलीस स्थानकामध्ये संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गापासून २०० मीटर अंतरावर असणारे लोणेरे गोरेगाव जाणाऱ्या रोडवर आरेापी अब्दुल मुतालीब महम्मद जाफर सुर्वे (४५) हा दुचाकीवरून व्हेल माशाच्या उलटीचे लहान मोठ्या आकाराचे तुकडे अवैध विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने वेळीच त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी व पाच कोटी रूपये किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीचे लहान मोठे आकाराचे तुकडे असा एकूण पाच कोटी ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणा मध्ये पोलीस कसून तपासणी करत असून, यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, विक्रीसाठी तो कुठे घेऊन जात होता, याचा सखोल शोध घेणे सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.