हर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी हर्णे येथील निसर्ग हॉटेलसमोरील समुद्रकिनारी असलेल्या दगडात व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ मिळाल्याची माहिती आज दुपारी पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांना दिली. ही माहिती पोलिसांनी पत्राद्वारे वनविभागाला दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक राजकुमार यादव, परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व त्यांचे सहकारी दुपारी २.३०च्या सुमारास हर्णै समुद्र किनाऱ्यावर पोचले. त्यांना हा उलटीसदृश पदार्थ दगडात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याला मोठ्या प्रमाणात वाळू लागलेली होती. त्यामुळे तो पदार्थ धुवून पंचनामा करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याची शंका व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोकण किनाऱ्यापासून खोल समुद्रात मोठ्या प्रमाणात व्हेल माशांचा वावर असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. या माशाच्या उलटीला बाजारात मोठी मागणी असून त्याची किंमतही अधिक आहे. व्हेल हा संरक्षित प्रजातींमध्ये गणला जातो. त्यामुळे त्या माशाच्या उलटीचेही जतन केले जाते. मागील चार-पाच वर्षात व्हेलची उलटी विक्री करणाऱ्या अनेकांवर वनविभाग आणि पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
व्हेलच्या उलटीचा उपयोग – खोल समुद्रात सापडणारा “स्पर्म” व्हेल हा संरक्षित घटक आहे. हा मासा ‘सीआयटीइएस’ यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडित कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे. व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. हे अत्तर लाखोच्या किमतीने विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटिव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.