उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच टीका केली असून, सरकारमध्ये सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. “ते जे वागले ते चूक होते,” असे खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी राजकीय आघाडी करणार काय, या प्रश्नावर त्यांनी पूर्वी अशा आशयाचा प्रस्ताव दिला होता, पण यावर चर्चा झाली नाही, असे मोघम उत्तर दिले. आज अख्खा भारतीय जनता पक्ष आहे असे सांगून ते म्हणाले, “खरेतर उद्धव ठाकरेजवळ आता आहेच काय? चिन्ह गेले. पक्ष फोडला, पक्षाचे नाव पळवले. आता माझ्या वडिलांना चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काहीही हाती न राहिलेल्या उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघू भाजपला यात यश मिळते का? माझ्याकडे माझा विचार आहे. माझे सैनिक आहेत अन् माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे. जनतेला हे सगळे ज्ञात आहे. त्यामुळे येत्या काळात चित्र स्पष्ट होईल. भाजपमध्ये राम राहिलेला नाही. फक्त ‘आयाराम’ संस्कृती सुरू आहे,” असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. भाजपच्या विरोधातले इंडिया हे संघटन आता बलशाली होते आहे असे सांगून ते म्हणाले, “बंगळूरमधील या बैठकीवर मोदींनी टीका केली. ही परिवार बचाव मोहीम आहे, असे ते म्हणाले. याबाबत बोलताना ते म्हणाले, “मोदी बोलले ते खरे आहे.
माझा देश हा माझा परिवार आहे अन् तो वाचवणे ही माझी जबाबदारी आहे.” मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन वर्षा सोडले. त्यावेळी लोकांच्या, महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते. या अश्रूंचे मोल मला माहिती आहे. अशा रीतीने जे झाले ते लोकांना आवडलेले नाही. मी मुळात मुख्यमंत्री व्हायलाच तयार नव्हतो. त्यामुळे मला तसे सांगितले असते, तर मी ते पद तसेही सोडून दिले असते. आपल्याच लोकांनी ते सांगितले नाही. पुढे जे झाले ते दिसतेय. जनतेच्या मनात या प्रकरणाचा जो रोष आहे तो मतपेटीतून बाहेर येईल, असा मला विश्वास आहे. या देशात लोकशाही राहावी, असे वाटत असेल तर २०२४ मध्ये जनता योग्य तो निर्णय नक्कीच घेईल. मात्र, विरोधकांचे ऐक्य हे या विषयात महत्त्वाचे आहे.
१९७७ ला जे झाले होते ते लक्षात घेत पावले टाकली जावीत. तशी ती टाकू दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रशंसा करताना ठाकरे म्हणाले, “मी त्यांना भेटलो. त्यांच्या भावना, देशाप्रती, नागरिकांसाठी असलेली त्यांची कटिबद्धता मला समजली. या गृहस्थाबद्दल आपण जे काही ऐकले आहे ते संपूर्णत: चूक आहे हे कळले. या देशाची परिस्थिती बदलण्यासाठी ते काम करीत आहेत.