मागील वर्षी व्हॉट्सअॅपने भारत सरकारद्वारे कोरोना हेल्पडेस्क आणले होते, आता त्यात एक नवीन वैशिष्ट्य जोडून व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांना जवळचे लसीकरण केंद्र सहज शोधण्याची आणि लसीचा स्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. MYGovIndia ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप आता लोकांना चॅटबॉक्सद्वारे जवळच्या लसीकरण केंद्राबद्दल माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला लस स्लॉट बुकिंग करण्यास मदत होणार आहे.
व्हॉट्सअॅप ने वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिलेली हि नवीन सुविधा नक्कीच उपयोगी ठरणार आहे. ज्याच्या मदतीने लसीकरण केंद्राचा पत्ता आणि तुमच्या लसीचा स्लॉट सहज बुक करू शकता येणार आहे. सरकारने तयार केलेल्या को-विन पोर्टलद्वारे, १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आता त्यांच्या लसीचे स्लॉट बुक करू शकतात आणि कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी लस घेऊ शकतात. ट्विटरच्या माध्यमातून आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी व्हॉट्सअॅपद्वारे स्लॉट बुकिंग करण्याच्या सुविधेबद्दल माहिती शेअर केली आहे.
को-विन पोर्टल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पुरवलेल्या नवीन चॅट बॉक्स वैशिष्ट्याद्वारे तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राबद्दल किंवा लस स्लॉट बुक करण्यासाठी जाणून घ्यायचे असल्यास, तुम्हाला सहज शक्य होणार आहे. शासनाच्या को-विन पोर्टलवरून तुमच्या मोबाईल नंबर टाकल्यावर, ओटीपी येऊन, क्षेत्राचा पिन कोड टाकून, तुम्ही जवळचे लसीकरण केंद्र सहज शोधू शकता. पिन कोड टाकल्यानंतर, तुमच्या जवळच्या केंद्रातील सर्व नोंदणीकृत लसींची यादी तुमच्या समोर येईल.
व्हॉट्सअॅपद्वारे लसीचा स्लॉट कसा बुक करायचा जाणून घेऊया थोडक्यात.
सर्वप्रथम MyGov Corona हेल्पडेस्क चॅटबॉक्स क्रमांक ९०१३१५१५१५ सेव्ह करायचा, त्यानंतर या नंबरवर व्हॉट्सअॅपवरून Hi लिहायचे, आपल्याला एक स्वयंचलित प्रतिसाद मिळेल आणि आपल्याला आपला पिनकोड अपलोड करणे गरजेचे आहे. त्या नंतर लस बुकिंगसाठी Book Slot लिहा आणि MYGovIndia Corona हेल्पडेस्कवर पाठवा. त्यानंतर ओटीपीची पडताळणी करून, जवळच्या लसीकरण केंद्रावर तुमची लस स्लॉट बुक करा. अशाप्रकारे व्हॉट्सअॅप आता लसीकरणासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे.