रस्ते, वीज आणि नळपाणी योजना यामुळे मोठ्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु आहे. प्रत्येक कामाची चर्चा सुद्धा जोरदार सुरु आहे. एका कामासाठी खोदकाम सुरु केले आणि ते पूर्ण झाल्यावर पुन्हा काही तरी निर्माण झालेल्या अडचणीमुळे पुन्हा खोदकाम सुरु हेच इतके दिवस सुरु आहे. त्यामुळे जनता आता असे सुद्धा कुजबुजत आहे कि, इतक उत्खनन केल्यावर कदाचित आधीच्या युगाचा शोध लागायचा.
रत्नागिरी शहराच्या नव्या नळपाणी योजनेचे काम गेले अनेक वर्ष चालू असून अनेक भागात पाइपलाइन पूर्ण झाल्याने डांबरीकरणालाही सुरूवात झाली आहे. शहरातील मुख्य भागातील पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असताना देखील, या नवीन टाकलेल्या पाइपलाइन मधून गळती होऊ लागल्यामुळे पुन्हा उत्खनन करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात संसारे कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर पुन्हा खोदाई चालू झाली आहे. रस्ता का खोदण्यात येत आहे याचे कारण एकच आहे जी नवीन पाईप लाईन गेल्या एक ते दोन महिन्यापूर्वी टाकण्यात आली आहे ती पाईप लाईन मधे गळती लागलेली दिसत आहे त्यामुळे या भागातील रस्ता खोदण्यात आलेला आहे.
जर नवीन टाकलेली पाईपलाईन दोन महिन्यांमध्येच नादुरुस्त होत असेल तर ठेकेदाराच्या कामाबद्दल आणि वापरण्यात येणाऱ्या सामानाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. तसेच शहरातील रस्ते डिसेंबरपूर्वी गुळगुळीत होतील अशी माहिती देण्यात येत होती, त्याप्रमाणे शहरातील काही भागात डांबरीकरण चालू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाण्याच्या नवीन पाईप लाईनला लागलेल्या गळती मुळे पुन्हा खोदकाम करावे लागत आहे; त्यामुळे पाईपलाईनचे नेमके काय चालले आहे व हे काम कसल्या दर्जाचे आहे आणि ते संपणार कधी ? असा प्रश्न लोकांना पडला आहे.