ज्या ८ मंत्र्यांवर टांगती तलवार आहे, त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, नरहरी झिरवळ यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आणखीही काही मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हे मंत्री कायम वादात राहिल्याने त्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
माणिकराव कोकाटे – एकूण ८ मंत्री अडचणीत आले आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषद सभागृहात मोबाईल -फोनवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हिडिओमध्ये ते रमी खेळताना दिसत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत असताना कृषीमंत्री रमी खेळण्यात मग्न असल्याचे दिसताच संतापाची लाट उसळली आहे. कृषीमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांची काही विधानेदेखील वादग्रस्त ठरली आहेत. विरोधी पक्ष सातत्याने कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यांना डच्चू देण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी याबाबतचा निर्णय घेऊ, असे आधीच सांगितले आहे.
जयकुमार गोरे – भाजपचे जयकुमार गोरे हेदेखील अडचणीत आले असून त्यांना देखील मंत्रीमंडळातून बाहेर काढण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या गोरेंवर एका महिलेकडून गंभीर आरोप झाले आहेत.
नरहरी झिरवळ – राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांच्यावर कार्यकर्त्यांशी असलेला संवाद अभाव आणि क्षेत्रातील अपयशाचे आरोप होत आहेत. त्यामुळे अकार्यक्षम मंत्री म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येत असल्याने त्यांनाही नारळ देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जाते.
संजय शिरसाट – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावरही टांगती तलवार आहे. खा. संजय राऊत यांनी अलिकडेच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून यामध्ये ते त्यांच्या घरात सिगारेट ओढत पैशाच्या बॅगेसह बसल्याचे दिसून येत आहे. या कथित व्हिडिओमुळे तेदेखील अडचणीत आले आहेत. त्यापूर्वी हॉटेल लिलावामध्येही त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांच्या मुलावरही आरोप करण्यात आले आहेत. या ५ जणांसह आणखी दोन ते तीन मंत्र्यांवर टांगती तलवार आहे.
दादा भुसे – शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. हिंदी सक्तीच्या विषयात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यात ते अपयशी ठरल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे.
नार्वेकर मंत्रीमंडळात ? – विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्याऐवजी विधानसभा अध्यक्षपदावर भाजपने नेते सुधीर मुनगंटीवार यांची निवड होऊ शकते. पक्ष देईल ती जबाबदारी आपण सांभाळण्यास तयार आहोत, अशी सूचक प्रतिक्रीया राहुल नार्वेकर यांनी याबाबत बोलताना दिली आहे.
शाहांशी २५ मिनीटे चर्चा – या सर्व नावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपचे हायकमांड केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. दोन नेत्यांमध्ये २५ मिनीटे शुक्रवारी दुपारी बंद दाराआड चर्चा झाली. सायंकाळी उशीरा मुख्यमंत्री भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेणार असल्याचे बोलले जाते. त्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत येतील. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक-दोन दिवसांत हा बदल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तळात सुरू आहे