दोन वर्षापूर्वी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीइओ पदी त्यांनी काम केले होते. जिल्ह्याची सामाजिक आणि भौगोलिक माहिती ज्ञात असल्याने जिल्ह्याला यांच्या ज्ञानाचा चांगलाच फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी ते निष्क्रिय ठरल्यामुळे जनतेमधून सत्ता बदला, सरकार बदला सोबत एकदा जिल्हाधिकारी पण बदलून बघा अशा प्रकारच्या मेमेजनी चर्चांना देखील उधाण आले होते.
रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी पदी रुजू झाल्यानंतर सुरुवातील त्यांचे कामकाज समाधानकारक होते, परंतु, कोरोना महामारीमध्ये त्यांचे धरसोड वृत्तीचे धोरण सर्व सामान्य जनतेच्याहि ध्यानात आल्याने, ते कायमच वादग्रस्त ठरले होतेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून जिल्हा दुसर्या लाटेमध्ये अडकून पडला. कोरोनाचा घट्ट बसलेला विळखा काही सुटायचं नाव घेत नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर सर्व स्तरातून ताशेरे ओढले जात होते.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये संक्रमण रोखण्यासाठी कधी संचारबंदी, कधी कडक लॉकडाऊन तर कधी विकेंड लॉकडाऊन केले जात होते. वर्षभर ठप्प असलेले उद्योगधंदे अगदीच डबघाईला आले. तरी सुद्धा नियोजनामध्ये काही तरी कमतरता राहिल्याने, रोजचा ५०० चा आकडा कमी होत नव्हता. लसीकरण वाढवण्यात आले, तरी बाधितांची संख्या कमी आली नाही. त्यामुळे जनतेच्या रोषाला बर्याचदा जिल्हाधिकार्याना सामोरे जावे लागले.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची रत्नागिरी मधून बदली होऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रत्नागिरीमध्ये अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.