महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात संघर्ष सुरू असतानाच पालकमंत्री उदय सामंत यांनी आपले मोठे बंधू किरण सामंत निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आणू असे विधान केल्याने आता महायुती अंतर्गत संघर्ष आणखी वाढणार अशी चिन्हे दिसत आहेत. भाजपचे प्रमोद जठार की शिंदे गटाचे किरण सामंत रिंगणात उतरणार याबाबत चर्चा रंगणार आहे. महायुतीत गेले काही महिन्यात भाजप आणि शिंदे गट असा दोन्ही बाजुने या जागेसाठी दावा केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी तर ही जागा आमच्याच वाट्याला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ना. उदय सामंत हेही ही लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळावी, यासाठी आग्रही आहे. गेले वर्षभर त्यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांच्या नावाची चर्चाही आहे. मात्र याच दरम्यान, चार महिन्यांपूर्वी भाजप नेते, केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी सिंधदर्गचे माजी आमदार प्रमोद जठार यांना खासदारकीसाठी कामाला लागण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ते दोन जिल्ह्यात सातत्याने संपर्क साधून आहेत. महायुतीचे उमेदवार तेच असतील असे संकेत प्राप्त होत असतानाच आता पुन्हा एकदा ना. उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांचे नाव घेतल्याने महायुतीतील संघर्ष आणखी वाढणार अशी चिन्हे आहेत.
चिपळूण येथे एका बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याच संदर्भात एक प्रश्न उपस्थित झाला होता. त्याला उत्तर देताना ना. सामंत म्हणाले की, किरण सामंत आपले मोठे बंधू आहेत. राजकीय संदर्भातील त्यांचा निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते उभे राहणार असतील तर त्यांना आम्ही साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे सरकार आहे. फक्त काँग्रेस पक्षच सत्तेच्या बाहेर आहे. भाजप, आरपीआय, राष्ट्रवादी असे पक्ष एकत्रितपणे जो निर्णय घेऊ तो सर्वांना मान्य असेल. एकत्र बसूनच उमेदवार ठरवले जातील.
किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना निवडून आणण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू, असे ना. सामंत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, ना. उदय सामंत यांचा प्रस्ताव भाजपला आणि विशेष करुन सिंधुदुर्गात नेतृत्व करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मान्य असणार का, याची आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे. एकेकाळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ना. राणे यांचा एकछत्री अंमल होता. मात्र २०१४ मध्ये निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत तर त्याच वर्षी ना. नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. दोन्ही जागी शिवसेनेच्या म्हणजे आताच्या ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. केवळ कणकवली विधानसभेची जागा नितेश राणे यांच्याकडे आहे.
मात्र असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे हे भाजपचे एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते हा मतदारसंघ सहजासहजी सोडतील, असे वाटत नसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप ८ महिन्यांचा कालावधी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. रत्नागिरीत लोकसभा मतदारसंघात ६ पैकी २ आमदार हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आहेत. तर ४ आमदार सद्यस्थितीत महाविकास आघाडीत एकत्र आहेत. असे असले तरी या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाची आजही मोठी ताकद असल्याचे मानले जाते.