महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमधील आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने आज प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावत आहेत. मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, बैठका, रोड शो, जाहीर सभा या सर्वांना आज सायंकाळी सहानंतर ब्रेक लागणार आहे. विशेष म्हणजे प्रचार संपण्याबरोबरच मतदानाआधी म्हणजेच 18 तारखेला प्रचाराची काळमर्यादा संपल्यापासून म्हणजेच सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंद केली जाईल. 19 तारखेला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला राज्यात ड्राय डे असेल. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असेल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 18, 19, 20 आणि 23 असे चार दिवस मद्यविक्री बंद असणार आहे.
निवडणूक आयोगानेच सांगितली आहेत कारणं – आता मतदानाच्या आधीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्यामागे काय कारणं आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने 20 मार्च 1995 च्या पंचायत तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या पत्रकामध्ये निवडणूक काळामध्ये जिथे निवडणूक असेल तिथे मद्यविक्री बंदी का आवश्यक असते याबद्दलची माहिती दिलेली आहे. हीच माहिती राज्यातील निवडणुकीला म्हणजेच विधानसभा निवडणुकीलाही लागू होते. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक 2024 पार पडत असल्याने ड्राय डेच्या तारखा सारख्याच राहणार आहेत.
…म्हणून दारुविक्रीवर घातली जाते बंदी – निवडणुकीच्या आधीचा, मतदानाचा आणि मतमोजणीचा दिवस ड्राय डे का असतो यासंदर्भात निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे त्यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:मद्य आणि नशेचे पदार्थ मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी तसेच मतदान झाल्यानंतरच्या दिवशी मद्याची विक्री बंद केली जाते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन कोणीही कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू नये या उद्देशाने मद्य विक्री निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान मतदानाच्या दिवशी बंद ठेवली जाते. सामाजिक संस्कृतिक सलोखा बिघडू नये असाही यामागील उद्देस असतो. मतदानाच्या दिवशी मद्याचं आमिष दाखवून मतदानावर कोणत्याही प्रकार परिणाम होऊ नये असाही या मागचा हेतू असतो. मद्यविक्रीवर बंदी घातल्याने बेकायदेशीररित्या उमेदवारांकडून केला जाणारा खर्चही टाळता येतो. मतदानाच्या आधीच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी कोणतीही मद्यविक्री करणारी दुकाने सुरु नसतात. तसेच हॉटेल, रेस्तराँ, क्लब आणि इतर ठिकाणी जेथे मद्य विक्रीसाठी उपलब्ध असतं त्यांना मद्याची विक्री करण्यास बंदी असते.वेगवेगळ्या क्लबला, आलिशान हॉटेल्सला, रेस्तराँरंट्सला वेगवेगळ्या परवानग्या तसेच परवाने देऊन मद्यविक्रीची परवानगी असली तरी त्यांना मतदानाच्या आधीच्या आणि मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करता येत नाही. या कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीने ठराविक प्रमाणापेक्षा अधिक मद्यसाठा करण्यावरही बंधन असतं. परवाना नसताना मद्याची साठवणूक करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो.