पावसाळा तोंडावर असल्याने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरण कामाने चांगलाच वेग घेतला आहे. कामात मोठा अडथळा ठरणाऱ्या कातळाचा बहुतांशी भाग फोडण्यात ठेकेदार कंपनीला यश आले आहे. या ठिकाणी मोठी यंत्रणा कार्यरत ठेवून एका बाजूच्या काँक्रीटीकरणाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या भागातील दोन्ही लेनची कामे पूर्णत्वास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. चिपळूण हद्दीतील ईगल इन्फ्रा कंपनीमार्फत बहुतांशी काम पूर्ण झाले असून केवळ २७० मीटरचे काँक्रीटीकरण शिल्लक आहे. एमआयडीसीची पाईपलाईन बदलण्यासाठी हे काम रखडले होते. मात्र आता पाईपलाईनचे कामही पूर्णत्वास गेले आहे. खेडच्या हद्दीत येणारे काम कल्याण टोलवेज कंपनी मार्फत सुरू आहे. हे काम एका अवघड वळणावर येऊन थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग मंदावला होता. मात्र आता कातळ फोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आलें आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी १ १२ ते सायंकाळी ५ दरम्यान घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत परशुराम घाटातील जुन्या मार्गावर भरावाचे काम पूर्ण केले. त्यानंतर आता कॉक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मागील तीन दिवस सातत्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काँक्रीटीकरण पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.