सिंधुदुर्गातील जमिनींसाठी लाळ घोटणाऱ्या धनदांडग्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘नेक्स्ट गोवा’ असे गोंडस नाव दिले आहे. गोव्याचा मोपा विमानतळ हा सिंधुदुर्ग पासून हाकेच्याअंतरावर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या तांब्या ठेवायला तरी जागा मिळेल का? अशी चिंता आता मालवणी मुलूखातील मंडळींना वाटू लागली आहे. शर्मा, यादव, ढक्कर, जैन, कंन्सल यासारख्या आडनावाच्या दिल्लीच्या धनदांडग्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीन खरेदीचा सपाटा लावल्याचे आता सर्वत्र चर्चिले जाऊ लागले आहे.. या सोकावलेल्या धनदांडग्यांचा सिंधुदुर्गवर जणू ‘डोळा’ आहे! दिल्लीतील धनदांडग्या मंडळींची नजर सिंधुदुर्गातील अद्भुत निसर्गरम्य भूमीवर पडली आहे, गोव्यापेक्षाही सुंदर सिंधुदुर्ग पाहून त्यांचे डोळे म्हणे दिपले, आहेत.
फक्त १ तास १० मिनिटे – गोव्यात मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला आणि मग या धनदांडग्या मंडळींची सिंधुदुर्गवर नजर पडू लागली. मोपा विमानतळा पासून कणकवलीत पोहोचायला १ तास १० मिनिटे लागतात. एवढ्या कमी वेळात गोव्यातून कणकवलीत येता येते गोव्यातील या मोपा विमानतळामुळे सिंधुदुर्गचा मोठा विकास होईल. परंतु दुसरी बाजू म्हणजे अनेक धनदांडग्यांच्या नजरा आता या सिंधुदुर्गाकडे वळल्या आहेत.
वरदान की शाप? – त्यामुळे मोपा विमानतळ. हा सिंधुदुर्गसाठी वरदान ठरणार की शाप ठरणार? असा प्रश्न आता मालवणी मुलूखातील मंडळींच्या मनात डोकावू लागला आहे. दिल्लीतील या धनवाद मंडळींची नजर सिंधुदुर्गातील अदभूत अशा नयनरम्य भूमीवर पडली आणि त्यांचे जणू डोळे दिपले. दिल्लीतील या धनदांडग्या मंडळींना दिल्लीतल्या काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याचीही चर्चा आता गावोगाव खुलेआम सुरु झाली आहे.
मारवाड्याने घेतली २५० एकर ? – त्यांनी प्रथम गोव्याला लागून असलेल्या दोडामार्ग व नंतर सावंतवाडी तालुक्यातील जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. एका मारवाड्याने सासोली गावातील सुमारे २५० एकर जमीन कुणाकुणाच्या नावावर खरेदी केली आणि मग कोटी कोटी घेऊन विकूनही टाकली. हे प्रकरण ग्रामस्थांनी आता लावून धरले आहे. हे लोण आता खारेपाटण पर्यंत येऊन ठेपेल अशी भीती आता मालवणी मुलुखात व्यक्त केली जाऊ लागली आहे.
एजंट व दलालांचे फावले – सिंधुदुर्गात जमीन खरेदी करणाऱ्या मंडळींची प्रामुख्याने शर्मा, यादव, ठक्कर, जैन, कंन्सल अशी आडनावे असल्याचे ‘सांगण्यात येते. या सर्व ‘धनवान मंडळींना सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी जमिनी मिळवून देण्यासाठी स्थानिक एजंट व दलाल पुढे सरसावले. काहींना म्हणे बड्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे हे एजंट व दलाल वाट्टेल त्या थराला जातात. धनवान मंडळींना सातबारावर नाव लावून देईपर्यंत सर्व कामे करतात, गुपचूप तगडे कमिशन घेतात आणि मोठा गाळा मारतात.
साम, दाम, दंड, भेद! – हे एजंट व दलाल लोक स्थानिक गोरगरीबांना भेटतात, गळ घालतात, जमिन विक्रीसाठी मन वळवतात.. साम, दाम, दंड, भेद सर्व उपाय योजले जातात.. शेतीची वाट बंद केली जाते.. शासकीय सवलती मिळू नयेत म्हणून आडकाठी आणली जाते.. कैक अडचणी निर्माण केल्या जातात.. आणि मग गोरगरीब आपली जमीन विकायला प्रवृत्त होतो अशी त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ असल्याची चर्चा आता गावोगाव सुरु झाली आहे.
बड्या पुढाऱ्यांचा आशिर्वाद ? – यामुळे हे एजंट व दलाल गब्बर झाले. फॉर्च्यूनर गाडीतून येणारे, हातातील बोटात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात चेन, वाढवलेली दाढी, वाढवलेले केस व ऐटदार पोशाख अशा थाटात ते वावरतात. रात्री काळ्या काचेच्या गाडीतून उतरणारे एजंट हे म्हणे काही बड्या राजकीय पुढाऱ्यांचे शागीर्द आहेत. असे हे दलाल व एजंट आता सिंधुदुर्गात गावोगावी पहावयास मिळतात. असेच चालू राहिले तर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तांब्या ठेवायला तरी जागा मिळेल का? अशी चिंता आता मालवणी मुलूखातील मंडळींना वाटू लागली आहे!