सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुजरातच्या दिशेला निघालेली एक संशयास्पद लाकडी बोट शुक्रवारच्या मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोटच्या सागरी हद्दीत सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पकडली. या लाकडी बोटीतून तब्बल ४ हजार शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक केली जात होती. हे प्रकरण प्राणी तस्करीचे सल्याचे तपासात समोर आल्यानंतर या बोटीवरील १६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गातून ही बोट कशी काय बाहेर पडू शकली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ही बोट पाकीस्तानला तर निघाली नव्हती ना? अशा शंकाही आता उपस्थित केल्या जात आहेत. सीमा शुल्क विभागाला जनावरानी भरलेली बोट उत्तरेच्या दिशेने निघाली असल्याची खबर लागली होती. त्यावरुन विभागाच्या पथकान शोध सुरू केला होता. सिंधुदुर्गतून गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास निघालेल्या एका बोटीचा नंबरही त्यांना प्राप्त झाला होता. त्यावरुन हा शोध सुरू होता. मात्र तब्बल ५ तासांचा शोध घूनही समुद्रात ही बोट ट्रेस होत नव्हती.सीमाशुल्क विभागाने इतर एजन्सीची या शोधकार्यात मदत घेतली. रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बाणकोट किनारी किनारपट्टीपासून ७५ नौटिकल मैल अंतरावर शुक्रवारच्या मध्यरात्री ही बोट सापडली. या बोटीचा रजिस्ट्रेशन क्र. वेगळा होता. मात्र तो बदलला गेला असण्याच्या शक्यतेवरुन सीमा शुल्क विभागाने ही बोट पकडली. या बोटीमध्ये मोठ्या प्रमाणात शेळ्या आणि मेंढ्या भरलेल्या होत्या.
रमजान ईदीच्या पूर्वसंध्येस ही बोट पकडण्यात आली. हा प्रकार प्राणी तस्करीचा असल्याच्या संशयावरुन पुढे तपास सुरू करण्यात आला. जवळजवळ ४ हजार शेळ्या-मेंढ्या या लाकडी बोटीत कोंबून भरण्यात आल्येल्या होत्या. बोटीत असलेल्या लोकांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही यामुळे चौकशी अंती या १६ जणांना अटक करण्यात आली आहे. तस्करी करणारयांनी बोटीचा रजिस्ट्रेशन क्र. बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोटीच्या मालकालाही या विषयाची खबर नसल्याचे तपासात पुढे आले आहे. ही बोट ताब्यात घेण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त अमित नायब यांनी माध्यमांना या संदर्भातली माहिती दिली. ताब्यात घेतलेली बोट आता जयगड बंदरावर आणण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे शेळ्या-मेढ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच संगोपनासाठी आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. स्वयंसेवी संस्थांनाही याचकरता हाक देण्यात आली आहे.