रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, संसर्गाला वेळीच आळा घालण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणि निर्बंध देखील घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी गर्दी उफाळू शकते, अशा ठिकाणांवर कडक निर्बंध किंवा बंदीच घालण्यात आली आहे. ओमिक्रॉनमुळे अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, शासनाने आदेशामध्ये थोडे बदल करून सुधारित निर्बंध जारी केले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रदूर्भाव लक्षात रत्नागिरी जिल्ह्यात भरवण्यात येणारे सर्व आठवडा बाजार बंद पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी तसे आदेश काढले आहेत. आठवडा बाजारामध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, जिल्ह्यात काही ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आठवडा बाजार सुरू केल्याची गंभीर बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दोनशेच्या पटीतच दिसत आहे. जिल्ह्यात बाधीत रूग्णांच्या संख्येत चिपळूण सर्वात पुढे आहे. त्यातच जिल्हाधिकार्यांनी आठवडा बाजारास बंदी आदेश दिला असतानाही मार्गताम्हाणे येथे गुरूवारी दुपारी शासकीय आदेश झुगारून आठवडा बाजार भरला. आठवडा बाजाराची बातमी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने, सायंकाळी ५ च्या सुमारास सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी आठवडा बाजारच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आठवडा बाजार खरेदी विक्री बंद करण्यास विक्रेत्यांना भाग पाडले.
शासनाने एवढ्या प्रमाणात संक्रमण वाढताना दिसत असून सुद्धा कोणत्याही प्रकारचे संपूर्ण लॉकडाऊन केले नसून, केवळ निर्बंध कडक केले आहेत. तरीसुद्धा शासकीय आदेश झुगारून अशा प्रकारे जनतेचे वागणे अयोग्य असल्याचे बोलण्यात येत आहे.