उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीच्या निघृण हत्येप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, तसेंच हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्यासाठी निघालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या मोर्चात एका विशिष्ट समाजातील महिला घुसली. या महिलेने अर्वाच्य भाषेत अश्लील शिवीगाळ करत मोर्चाला गालबोट लावल्याने तणाव निर्माण झाला; मात्र पोलिसांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले. यानंतर मोर्चेकरांनी येथील पोलिस ठाण्यात धडक देऊन ‘त्या’ महिलेवर कडक कारवाईची मागणी केल्यावर महिलेवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नवी मुंबई उरण येथील यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याबरोबरच हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा लागू करण्याबाबत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेतर्फे गुरुवारी चिपळूणमध्ये भव्य मोर्चा काढला. मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. ‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,’ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तत्काळ लागू करा, अशा घोषणा दिल्या. या मोर्चादरम्यान मान्यवरांची भाषणे सुरू असतानाच एका विशिष्ट समाजातील महिला मोर्चात घुसली आणि तिने अर्वाच्य भाषेत अश्लील शिवीगाळ सुरू केली. यामुळे तणाव निर्माण झाला.
मोर्चेकरांनी या महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या महिलेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. यानंतर संतप्त मोर्चेकरी पोलिस ठाण्यावर धडकले. जोरदार घोषणाबाजी करत या महिलेला आमच्या ताब्यात द्या. या महिलेवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे, अशी मागणी करत ठिय्या मांडला. पोलिसांनी ‘त्या’ महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ग्वाही दिली; मात्र कारवाई होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतली होती. हा काही कटाचा भाग आहे की काय, असा आम्हाला संशय असून, यादृष्टीनेही पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी मोर्चेकरांतर्फे रामदास राणे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मोर्चेकरांशी संवाद साधून ‘त्या’ महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली. प्रशासनाला यशश्री शिंदे या तरुणीला न्याय मिळण्यासंदर्भात निवेदन दिले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस व माजी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, निनाद आवटे, अनिल सावर्डेकर, भाजप महिला मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष शीतल रानडे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
तीव्र भाषेत भावना व्यक्त – भाजप जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, सुरेश शिंदे, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शिवसेना युवा सेना तालुकाधिकारी निहार कोवळे, मनसे चिपळूण शहराध्यक्ष अभिनव भुरण, संदेश भालेकर, साधना कात्रे आदींनी तीव्र भाषेत भावना व्यक्त करताना ‘त्या’ महिलेविरोधात संताप व्यक्त केला, तर मोर्चेकरांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद दिला असल्याचे मोर्चेकरी रामदास राणे यांनी सांगितले.
चिपळूण बाजारपेठ आज बंद – उरणमधील यशश्री शिंदे हिच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ चिपळूण व्यापारी महासंघातर्फे शुक्रवारी (ता. २) चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी एकमुखाने घेतला. उरण येथील घटनेवरून सायंकाळी व्यापाऱ्यांची बैठक झाली.