तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा मृतदेह चिपळूण धामणदेवी परिसरात वाशिष्ठी नदीपात्रात शुक्रवारी सकाळी आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र पती निलेश अहिरेचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्याचा शोध सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आत्महत्येबाबत चिपळूणात उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत असून आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. चिपळूण शहरातील निलेश अहिरे व त्याची पत्नी अश्विनी अहिरे यांनी बुधवारी गंधारेश्वर येथील रेल्वेब्रिजवरून वाशिष्ठी नदीपात्रात उडी घेतली. प्रत्यक्षात दांपत्याने एकत्र उडी घेतली अशी माहिती पुढे आली होती, तर प्रथम अश्विनीने उडी घेतली त्यानंतर निलेशने उडी मारली, असेही काही प्रत्यदर्शी सांगतात. परंतु अश्विनीने आधी उडी घेतली हे त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. तर निलेशने उडी घेतली, या बाबत कोणतीच स्पष्टता समोर आलेली नाही, अशीही चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
हरहुन्नरी तरूण – निलेश हा उदयोन्मुख व्यापारी तरुण होता. चिपळूण मध्यवर्ती एसटी स्टॅण्डजवळ स्वागत हॉटेलसमोर त्याचे मोबाईलचे दुकान होते. अत्यंत शांत, संयमी व मनमिळावू असलेल्या निलेशने काही महिन्यांपूर्वी लग्न केले होते. शहरातील पाग परिसरात तो पत्नी अश्विनीसह भाड्याने राहत होता. बुधवारी सकाळी तो दुकानावर देखील आला होता. त्यानंतर तो दुचाकी घेऊन गंधारेश्वर येथील ब्रिजवर गेला आणि पत्नीच्या पाठोपाठ वाशिष्ठी नदीपात्रात उडी घेतली, तेव्हा पासून या दाम्पत्याचा शोध घेतला जात होता. पोलीस तसेच एनडीआरएफचे पथक संपूर्ण नदीपात्रात सतत शोध घेत होते. परंतु शोधकार्याला यश येत नव्हते. दरम्यान शुक्रवारी सकाळी धामणदेवी येथील वाशिष्ठी नदीपत्रात एका महिलेचा मृतदेह दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ धाव घेऊन स्थानिकांच्या व एनडीआरएफच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून प्रथम ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मृतदेह अश्विनी अहिरेचा असल्याची ओळख पटली तसेच नातेवाईकांनीदेखील तसे पोलीसांना सांगितले. तो शवविच्छेदनांसाठी कामथे रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनंतर नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला.