मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील कोसळलेली सरंक्षक भिंत व खचलेल्या काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून प्लास्टिक कापडाचे आच्छादन टाकण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर परशुराम घाटातील काम पूर्णपणे थांबले असून, तेथील यंत्रणाही हलवण्यात आली आहे. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा घाटात कामाला सुरुवात केली जाणार असून, त्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या महाड कार्यालयाकडून करण्यात आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट हा कोकणातील महत्त्वाचा घाट आहे. या घाटाची एकूण लांबी ५.४० किलोमीटर आहे. महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यांतील कंत्राटदार कंपनीमध्ये हा घाट विभागला गेला आहे.
घाटातील संपूर्ण काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर संरक्षक भिंतीच्या कामावर लक्ष केंद्रित केले. मात्र, २०२२ मध्येच या काँक्रिटीकरणातील काही भाग खचला. परिणामी, त्यावर उपाययोजना म्हणून सरंक्षक भिंत व गॅबियन वॉल उभारण्याचा निर्णय झाला; परंतु हे काम सुरू असताना अचानक संरक्षक भिंत कोसळली. त्या पाठोपाठ पायथ्यालगत उभारलेल्या गॅबियन वॉलचा भागही पहिल्या पावसातच खचला. सध्या या ठिकाणचे काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत काही किरकोळ बदल करण्याचे नियोजन सुरू आहे. तसा प्रस्तावही तयार केला जात आहे; मात्र सध्या पावसाचा जोर कायम असून, या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना म्हणून कोसळलेल्या संरक्षक भिंतीवर प्लास्टिकचे आच्छादन, तसेच ठेवण्यात आले आहे.
प्रवास सुरक्षित राहिलेला नाही – परशुराम घाटातील प्रवास अजूनही सुरक्षित राहिलेला नाही. एकीकडे लोखंडी जाळ्यांच्या माध्यमातून दरडीचा भाग संरक्षित करण्यात आला आहे; मात्र रस्त्याच्या खालील बाजूस अजूनही काही ठिकाणी काँक्रिटीकरण खचणे, तडे जाण्याचे प्रकार घडत आहेत, तसेच या घाटात संरक्षक भिंतीच्या वरील बाजूस असलेल्या दरडीला लोखंडी जाळी लावल्याने त्याचा यावर्षीच्या पावसात चांगला परिणाम दिसून आला. दरड कोसळली नाही. मात्र, रस्त्याच्या खालील बाजूस डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या वस्तीला वाहून गेलेल्या चिखलाचा मोठा फटका बसला. त्यामुळे येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.