रत्नागिरी, लांजा व चिपळूण या हायटेक बसस्थानकाचे एकाचवेळी काम हाती घेण्यात आले; मात्र गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने ही कामे रखडली आहेत. यातील रत्नागिरी येथील बसस्थानकाचे काम वेगाने सुरू असले तरी महामार्गावरील मध्यवर्ती असलेल्या चिपळूण बसस्थानकाचे काम अजून रखडलेलेच आहे. दोन दिवसाआड काम कधी बंद तर कधी चालू ठेवले जात आहे. या कामासंदर्भात ठेकेदार कंपनीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊनही अद्याप चालढकल सुरू आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा आणि चिपळूण या तीन बसस्थानकांचे काम एकाचवेळी २०१७ मध्ये सुरू झाले. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी या कामांचे धुमधडाक्यात भूमीपूजन केले होते; मात्र त्यानंतर आलेल्या तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या हायटेक पद्धतीच्या बसस्थानकासाठी रत्नागिरीला १० कोटी, चिपळूण ३ कोटी ८० लाख तर लांजासाठी १ कोटी ५० लाखांचा खर्च येणार आहे. रत्नागिरीसाठी आणखी कोट्यवधीचा निधी पालकमंत्री सामंत यांनी मिळवून दिला; मात्र वाढीव निधीअभावी चिपळुणातील हायटेक बसस्थानकाचे काम अडचणीत आले.
त्यामुळे चिपळूण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत गेल्या पाच वर्षापासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात रत्नागिरी बसस्थानकाचे काम ३६ महिन्यांत तर लांजा व चिपळुणातील काम २४ महिन्यात होणे अपेक्षित होते; मात्र ६ वर्षे उलटली तरी चिपळूण बसस्थानकाच्या इमारतीच्या तळमजल्याचेच काम सुरू आहे. बांधकामाचे लोखंडही गंजून गेले. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी २४ तास एसटीची सेवा सुरू असते. कार्यशाळा देखील २४ तास सुरू असते; मात्र स्थानकाची इमारत नसल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. जुनी इमारत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू होण्यासाठी अनेकांनी आंदोलने केली. अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.