अखेर शीळ धरणापासून ते जॅकवेलपर्यंतच्या ५५० मीटरच्या जलवाहिनीचे पाईप कोलकात्याहून दाखल झाले आहेत. त्यामुळे वर्षभर रखडलेले हे काम काही दिवसांत पूर्ण होऊन शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. फ्लोटिंग पंप पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती आता संपली असून, लवकरच जलवाहिनीतून जॅकवेलमध्ये नैसर्गिक उताराने पाणी येणार आहे. सुधारित पाणी योजनेमध्ये हे काम होते; परंतु वर्ष झाले तरी या कामाकडे त्या गांभीयनि लक्ष देण्यात आले नव्हते. जॅकवेल खचल्यानंतर तात्पुरता फ्लोटिंग पंपांचा पर्याय काढला होता. आजवर त्या फ्लोटिंग पंपाद्वारेच शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदाच्या पावसाळ्यात शीळ नदीला पूर आल्यास फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती होती. तसे झाले तर पुन्हा शहरावर पावसाळ्यात पाणी पाणी करायची वेळ आली असती. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यामध्ये लक्ष घातल्यावर या कामाला गती आली. पावसापूर्वी हे काम पूर्ण करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. पालिका प्रशासनाकडून या जलवाहिनीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पाईप मागविले होते. ५५० मीटरसाठी आवश्यक पाईप आले असून, शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
वीजबिलाचे दोन लाख रुपये वाचणार – फ्लोटिंग पंप सुरू झाल्यापासून महिन्याला या चार पंपांचे सुमारे २ लाख वीजबिल पालिकेला भरावे लागते. त्यात पाऊस जास्त झाला, तर फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती होती; परंतु या जलवाहिनीचे काम झाल्यानंतर वीजबिलाचा आणि फ्लोटिंग पंप वाहून जाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.