गाणे-खडपोली एम.आय.डी. सी. परिसरातील साफईस्ट कंपनी प्रा. लि. येथील तब्बल २४० कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ कामगार वर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात आवाज उठवत दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. कामगारांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ते सर्व खडपोली, गाणे, वालोटी, कळकवणे, तसेच आसपासच्या गावांतील रहिवासी असून काहीजणांनी या कंपनीत तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आहे. मात्र, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कामगारांना कामावरून कमी केले. या पार्श्वभूमीवर दि. २७ सप्टेंबर रोजी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन, प्रशासकीय अधिकारी व कामगार प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत व्यवस्थापनाच्यावतीने आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीने कामगारांना टप्याटप्याने पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते.
१३० कामगारांना परत घेतले – परंतु प्रत्यक्षात केवळ १३० कामगारांनाच कामावर घेतले गेले, तर उर्वरित कामगारांना आजतागायत कामावर घेण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे, तर कामावर परतलेल्या कामगारांनाही अपमानकारक वागणूक दिली जात असून दोन कामगारांचे काम एका व्यक्तीकडून करवून घेतले जात आहे, असा आरोप या कामगारांनी केला आहे.
१४ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण – या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व कामगारांनी दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या कुटुंबीयांसह कंपनीसमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांचे म्हणणे आहे की, आम्हाला कोणताही संघर्ष नको, फुक्त न्याय हवा. आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या कुटुंबीयांसहित उपोषण करणार आहोत. या प्रकरणामुळे गाणे-खडपोली औद्योगिक क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन व कामगार विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. या वेळी निलेश गजमल, शिवाजी गुरव, गणेश गजमल, दीपक जाधव, रोशन राणे, विक्रम घाग, संतोष खरात, आदेश सुतार, संकेत सुर्वे, संदेश जोंधळे, निलेश शिर्के यांच्यासह १२०हून अधिक कामगार उपस्थित होते.