कोरोनाचे संकट अचानक उद्भवल्याने देशात एकदम आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मागील वर्षीपेक्षा आता प्रमाण थोडे कमी आल्याने, आणि मुख्यत्वे करून लस उपलब्ध झाल्याने राज्य आणि केंद्रशासन जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करण्याकडे भर देत आहे.
१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. या दिनाचे औचित्य साधून देशामध्ये कोरोना निर्बंधित लसीकरणाचा एक नविन विक्रम प्रस्थापित केला गेला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी कोरोना लसीचे २.५ कोटीहून अधिक डोस देण्यात आले. चीनच्या नावावर या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम होता. चीनने एकाच दिवसामध्ये २.४७ कोटी लस वितरित केल्या होत्या. भारताने तो विक्रम मोडित काढला असून, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी कोरोना निर्बंधाचे ध्यान ठेवून, विविध लहान मोठे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीमध्ये सुद्धा भाजपतर्फे सेवासप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर आणि तालुका भाजपतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयामधील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच निरीक्षणगृह संस्थेमध्ये सुद्धा धान्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सफरचंद, केळ्यांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आखण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, , महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, जिल्हा सचिव सचिन वहाळकर, राजेश सावंत, राजेंद्र पटवर्धन, नगरसेविका मानसी करमरकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.