नुकत्याच २०२१ च्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या आहेत. भारताने या स्पर्धेत ७ पदके जिंकली आहेत. त्यातील कुस्तीपटू रवी दहियाने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. यानंतर पदक जिंकलेल्या खेळाडूंवर सर्वत्र बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये कुस्ती या खेळात भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने रौप्य पदक जिंकले आहे. परंतु, उपांत्य सामन्यामध्ये त्याचा प्रतिस्पर्धी असलेला कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरिस्लाम सनायेवने त्याच्या दंडाला चावा घेतल्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाले होते तरीही रवीने त्याची पकड ढिली पडू न देता, प्रतीस्पर्धीचा पराभव केला. रवीने स्वतः याबाबत खुलासा केला आहे, दुसऱ्या दिवशी सनायेवने संधी मिळताच रवीची माफी मागितली. रवीने त्याबद्दल सविस्तर सांगितले कि, दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही आमचे वजन तपासायला गेलो, तेव्हा सनायेव माझ्या आधीच तिथे हजर होता. मग त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला की, मला माफ कर भाऊ, मी चुकीच वागलो. कारण मी सर्व स्पर्धा संपल्यावर विसरून गेलो होतो. यावर मी हसून त्याला पुन्हा मिठी मारली.
दिल्ली सरकारने रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहियाचा खास गौरव केला आहे. दिल्ली सरकारने त्याचा सन्मान करण्यासाठी वापरलेला खास मार्ग म्हणजे, त्यांनी रवी दहियाच्या लहानपणीच्या शाळेचे नाव बदलून त्याचे नाव शाळेला देण्यात आले आहे. हि गोष्ट रवीसाठी खूपच आनंददायी ठरली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रवी दहियाचा सन्मान करताना म्हटले की, दिल्लीच्या सरकारी शाळेत शिक्षण घेणारा रवी दहिया, त्याने घेतलेल्या मेहनत, जिद्द आणि क्रीयाशीलतेमुळे आज देशाचा युथ आयकॉन बनला आहे.
यंदाच्या २०२१ सालातील टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक पदक कमावली आहेत. यानंतर ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत त्यांचे अभिनंदन केले.