24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplunदिवाळीच्या गोडव्याने वर्षानुवर्षाचे राजकीय वितुष्ट संपले - आम. भास्कर जाधव

दिवाळीच्या गोडव्याने वर्षानुवर्षाचे राजकीय वितुष्ट संपले – आम. भास्कर जाधव

राजकीय जीवनात रमेश कदम प्रथमच आम. जाधवांच्या घरी गेले आणि दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

राजकारणात कायमस्वरूपी कोण कोणाचा शत्रु नसतो, याची प्रचिती आता चिपळूणमध्ये येत आहे. गेले कित्येक वर्षे एकमेकाचे राजकीय शत्रु असलेले आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गळाभेट घेऊन एकमेकाला पेढा भरवत राजकीय वितुष्ट संपुष्टात आणल्याचे दाखवून दिले. तर या स्नेह भेटीने चिपळूणात जणू नवीन राजकीय पर्वाचे संकेतच मिळाले आहेत. चिपळूणच्या राजकारणात माजी आमदार रमेश कदम आणि आमदार भास्कर जाधव ही राजकारणाची दोन विरुद्ध टोके, समाजवादी विचारसरणीत तयार झालेले शांत संयमी रमेश कदम तर आक्रमक ज्वलंत विचारसरणीच्या मुशीत तयार झालेले भास्कर जाधवांनी ग्रामीण भागातून आपल्या राजकीय इनींगला त्याच शैलीत सुरुवात केली.

तर रमेश कदमांनी चिपळूण शहरातून राजकारण क्षेत्रात उडी घेतली. भिन्न विचार सरणीच्या पक्षात असलेल्या या दोन्ही नेत्यांचे शहकाटशाह चे राजकारण सुरू झाले, पुढे वर्चस्वाची लढाई सुरू झाली. राजकीय वर्चस्वाच्या संघर्षात दोन्ही नेते टोकाला पोहचले एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रु बनले. गेले कित्येकवर्ष आमदार जाधव आणि रमेश कदम या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. चिपळूणमध्ये कोणतीही निवडणूक होऊदे, आम. जाधव विरुद्ध रमेश कदम असेच स्वरूप त्या निवडणुकीला मिळत राहिले. फक्त नेतेच नव्हे तर त्यांचे समर्थक देखील एकमेकांचे कट्टर राहिले होते.  परंतु गेल्या वर्षभरापासून हे या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वितुष्ट कमी होत असल्याचे दिसून येत होते.

चिपळूणात निघालेला मराठा मोर्चा त्याची नांदी ठरली होती. त्यावेळी आम. जाधवांनी रमेश कदमांची गळाभेट घेत घोषणा दिल्या होत्या. नंतर दहीहंडी कार्यक्रमात आम. जाधवांनी रमेश कदम यांचे तोंडभरून कौतुक केले होते. त्यामुळे लवकरच हे दोन्ही नेते एकत्र येण्याची चिन्हे दिसत होती. आता दिवाळीच्या सणांने मात्र या दोन्ही नेत्यांना मनाने एकत्र आणले न असेच चित्र आहे. दीपावली पाडव्या निमित्त आमदार भास्कर जाधव यांनी पूजा तसेच दिवाळी स्नेह भेटीचे आयोजन आपल्या निवासस्थानी केले होते. या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील त्यांनी आपले मित्र, आप्तेष्ट तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना दिले होते. माजी आमदार रमेश कदम यांना देखील आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते.

पण रमेश कदम थेट भास्कर जाधवांच्या घरी जातील हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. परंतु रमेश कदम या कार्यक्रमाला पोहचले. दोन्ही नेत्यांनी घट्ट गळाभेट घेतली. आम. भास्कर जाधवांनी त्यांचे अगत्याने स्वागत केले. विचारपूस, गप्पा, आणि फराळाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी रमेश कदम आणि आम. भास्कर जाधवांनी एकमेकाला पेढा भरवून वर्षानुवर्षाचे राजकीय वितुष्ट संपल्याचे जणू दाखवून दिले. दोघांच्या समर्थकांनी देखील या भेटीचा आनंद लुटला. राजकीय जीवनात रमेश कदम प्रथमच आम. जाधवांच्या घरी गेले आणि दिलखुलासपणे गप्पा मारल्या. हा चिपळूणच्या राजकीय वर्तुळात चर्चे चा विषय बनला असून नवीन राजकीय पर्वाचे संकेत या भेटीतून मिळाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular