तालुक्यातील चरवेली व पानवल येथील ३ तरुण शहराजवळील मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या पाठीमागील खडपात मासे गरविण्यासाठी गेले होते. यातील राहुल घवाळी हा तरुण अचानक समुद्रात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्राने पाण्यात उडी घेतली. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी रात्री उशीरा त्याचा मृतदेह भारती शिपयार्ड कंपनीजवळील समुद्रात आढळला. दरम्यान, पाण्यात उडी मारणारा तरुण बेशुद्धावस्थेत असून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चरवेली येथील राहुल राजेंद्र शिंदे (वय २४), दिगंबर अनंत गराटे (वय २०) दोघे रा. चरवेली, रत्नागिरी) व राहूल घवाळी (वय २४ रा. पानवल, रत्नागिरी) असे सोमवारी (ता. १७) दुपारी ३.४५ वा. च्या सुमारास मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या पाठीमागील खडपात मासे गरविण्यासाठी गेले होते. राहुल घवाळी मासे गरवत असताना अचानक आलेल्या लाटेत फसला. तो पाण्यात ओढला जाऊ लागला. त्याला वाचविण्याचा राहुल शिंदेने भरपूर प्रयत्न केला. समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेलेल्या राहुल घवाळी याने राहुल शिंदे याने पाण्यात टाकलेली मासे गरविण्याचा स्टिकही पकडली होती; पण पाण्याचा प्रवाहच इतका मोठा आणि वेगवान होता की त्यामुळे तो हाती लागला नाही.
राहुलच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडा-ओरडा केल्यानंतर मिऱ्या येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना राहुलच्या सोबत असलेल्या मित्रांनी घटनेची माहिती दिली. तसेच ही खबर शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेत बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव राहुल शिंदे असे असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सायंकाळी उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान वाहून गेलेल्या राहुल घवाळीचा मृतदेह रात्री उशिरा सापडल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
वाचविण्याचे सारे प्रयत्न फेल – दरम्यान, राहुल घवाळी याला वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तो समुद्रात बुडाल्याची माहिती गावात कळताच त्याच्या गावातील अनेक मंडळी धावत आली होती. त्याचा मित्र राहुल शिंदे याने स्वतःचां जीव धोक्यात घालत राहुलला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाती तो काही लागला नाही. त्यानंतर काठावर मदतीसाठी आलेल्या अनेकांनी या तरुणाला बुडताना पाहिले. मात्र, त्याला वाचविणे शक्य झाले नाही. आपत्कालीन यंत्रणेकडे असलेले दोर त्याच्यासाठी समुद्रात फेकण्यात आले होते. मात्र, राहुल घवाळी याचे वजन खूपच असल्याने हा दोर पकडल्यानंतर पाण्याच्या वेगवान प्रवाहातून तो खेचणे शक्य झाले नाही. त्यामुळे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले.