“आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे, युवकांनी ठरवले आहे की आता परिस्थितीत बदल झालाच पाहिजे.. जग वेगाने पुढे जात असताना आयुष्यभर काय आंबे काढीत बसायचे?.. आता चांगल्या प्रकारचे जीवन जगता आले पाहिजे यासाठी विकास झालाच पाहिजे.. त्यासाठी चांगले प्रदुषण नसलेले प्रकल्प यायलाच पाहिजेत.. हा साऱ्या युवकांचा ठाम निर्धार आहे. म्हणूनच येऊ घातलेल्या प्रकल्पांना सर्व समाजातील मान्यवरांचा एकमुखी पाठींबा लाभला ! ग्रामस्थांच्या सर्व मागण्या देखील मान्य झाल्या असल्याने आता ग्रामस्थ खुल्या दिलाने प्रकल्पाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत” व असे जोशपूर्ण प्रतिपादन वाटदचे तरुण तडफदार नेते श्री. अनिकेत सुर्वे यांनी केले. वाटद गावचे सरपंचपद श्री. अनिकेत सुर्वे यांनी भुषविले आहे. वाटद दशक्रोशीतील एक नव्या युगाचे व ताज्या दमाचे शिलेदार म्हणून ते ओळखले जातात.
७८ वर्षात प्रथमच योग ! – श्री. अनिकेत सुर्वे यांनी सांगितले की, “वाटद परिसरात येवू घातलेले प्रकल्प हे १०० टक्के प्रदुषण विरहीत प्रकल्प आहेत हे स्पष्ट होय. हे प्रकल्प इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स असल्याने प्रदुषण मुक्त आहेत. असे प्रकल्प आपण म्हणू तेव्हा आपल्या वाट्याला येत नसतात. परंतु यावेळी स्वातंत्र्यानंतर सुमारे ७८ वर्षांमध्ये प्रथमच ‘योग’ जुळून आला आणि आपले आमदार हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री झाले. त्यामुळेच असे प्रकल्प प्रथमच कोकणात येत आहेत” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदुषणमुक्त प्रकल्प ! – श्री. अनिकेत सुर्वे यांनी पुढे सांगितले की, “म्हणूनच सांगतो असा “योग’ कृचितच मिळतो व जेव्हा असा योग नशीबात येतो तेव्हा ती सुवर्णसंधी साधायची असते. जर ही सुवर्णसंधी आपण गमावली तर आपण म्हणू तसे इंजिनिअरींग व इलेक्ट्रॉनिक प्रदुषण मुक्त प्रकल्प मिळतीलच असे नाही. जर आपण संधी घालवली तर मग आपल्यासारखे करंटे आपणच असू ! आम्ही यापूर्वी काही प्रकल्पांना विरोध केला कारण ते प्रकल्प प्रदुषण करणारे होते. याचा अर्थ सर्वच प्रकल्पांना सरसकट विरोध असा होत नाही. आता येणारे प्रकल्प प्रदुषण मुक्त असल्याने आम्ही सारेजण त्याचे समर्थन करीत आहोत” असे त्यांनी सांगितले.
तरुणाईचा एकमुखी पाठींबा – श्री. अनिकेत सुर्वे उत्साहाने बोलत होते. त्यांनी सांगितले, “है प्रकल्प केवळ प्रदुषण मुक्त आहेत असे नव्हे तर भरपूर नोकऱ्या उपलब्ध करुन देणारे आहेत. त्यामुळे येथील तरुणांना आपल्या घराजवळ उत्तम प्रकारच्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. आता येथील तरुणांना चांगल्या प्रकारचे उत्तम दर्जाचे जीवनमान हवे आहे. त्यासाठी ही सुवर्णसंधी होय. हजारो तरुणांना आपल्या घराजवळच नोकऱ्या मिळतील. म्हणूनच साऱ्या तरुणाईचा या प्रकल्पांना एकमुखी पाठींबा आहे” असे त्यांनी निदर्शनास आणले.
भरघोस वेतनाच्या नोकऱ्या – श्री. अनिकेत सुर्वे तन्मयतेने बोलत होते. त्यांनी सांगितले, “नोकरीसाठी, रोजीरोटीसाठी युवकांना व ग्रामस्थांना मुंबई – पुणेसारख्या शहरात जावे लागणार नाही. येथील तरुण वर्ग आपल्या आईवडील व कुटुंबियांसमवेत गावातच राहून उत्तम प्रकारची नोकरी करु शकणार आहे. रायफल सारखी लष्कराला लागणारी शस्त्रे उत्पादन करणारा प्रकल्प हा केंद्र सरकारच्या व संरक्षण खात्याच्या निगराणीखाली होणार असल्याने सर्व बाबींचे तंतोतंत पालन करुनच तो होईल. म्हणूनच तरुणांना भरघोस वेतन देणाऱ्या नोकऱ्या आपल्या गावातच उपलब्ध होतील” असे त्यांनी नमूद केले.
‘डबल बोनस’ प्रकल्प ! – श्री. अनिकेत सुर्वे एक अभ्यासू युवा नेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी सांगितले, “हे प्रकल्प म्हणजे येथील ग्रामस्थ व नागरिकांसाठी ‘डबल बोनस’ आहेत. कारण या प्रकल्पासाठी राहती घरे, शेती बागायतीची जमीन पाणीपुरवठ्याचे जलस्त्रोत, मंदिर मशिदीसारखी धर्मस्थळे, शाळा वगळण्यात येणार आहेत. केवळ वर्षानुवर्षे ओस असलेली कातळ जमीन घेतली जाईल आणि त्याला देखील सर्वाधिक दर देण्यात येणार आहे.. येथील स्थानिक जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत. ना. उदय सामंत येथील जनतेचे नेते असल्याने ते स्वतः डोळ्यात तेल घालून जनहिताची काळजी घेत आहेत” असे त्यांनी निक्षून सांगितले.
युवकांसाठी ट्रेनिंग – श्री. अनिकेत सुर्वे यांनी सांगितले, “अनेकदा स्थानिक युवक कुशल नसल्याने त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. याबाबतीतहीं ना. उदय सामंत यांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. त्यांनी स्वतः सांगितले आहे की प्रत्यक्ष प्रकल्प सुरु होण्यापूर्वी त्या कंपनीतर्फे स्थानिक युवक व ग्राम स्थांसाठी ट्रेनिंग दिले जाईल. त्यामुळे स्थानिक युवकांना व ग्रामस्थांना येथे सहज नोकऱ्या मिळतील, ना उदय सामंत हे या मतदार संघाचे नेते असल्यामुळे या सर्व बारीक सारीक बाबी ते आत्मीयतेने पहात आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना नाव ठेवण्याजोगे काहीच नाही” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मेड इन वाटद’ रायफल्स – त्यांनी पुढे सांगितले, “संरक्षण दलाला लागणाऱ्या रायफल्स व अन्य बाबींचे उत्पादन करण्यासाठी खुद्द केंद्र सरकार व संरक्षण खात्यांनी त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत. येथे उत्पादन होणाऱ्या रायफल्स या सीम ‘वर लढणाऱ्या आपल्या जवानांच्या हांती असतील. थोडक्यात ‘मेड इन वाटद’ रायफल्स घेऊन आपले सैनिक सीमेवर सज्ज राहतील आणि शत्रूला आस्मान दाखवतील याचा आपल्या – सर्वांना रास्त अभिमान वाटला पाहिजे” असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
अनेक सुविधांचा लाभ – श्री. अनिकेत सुर्वे यांचा विकास कामांचा अनुभव फार मोठा आहे. त्यांनी सांगितले, “या प्रकल्पांच्या अनुषंगाने अनेक सुविधा या परिसरात निर्माण होतील. त्या सर्व सुविधांचा लाम येथील स्थानिक जनतेलाच मिळणार आहे. हा देखील या कल्पांमुळे येथील स्थानिक जनतेला मिळणारा एक फार मोठा फायदा ठरेल. साऱ्या परिसराचा कायापालट होईल आणि पंचक्रोशीत अनेक प्रकारचे पुरक उद्योग तसेच सेवा उद्योग सुरु करण्याची संधी स्थानिक व्यावसायिकांना जनतेला लाभेल” अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
जोशपूर्ण आवाहन – श्री. अनिकेत सुर्वे यांनी तडफेने सांगितले की, “येथील निसर्ग संपदेवर किंचितही परिणाम न करणारा, पूर्णतः निर्धोक व प्रदुषण मुक्त असा असलेला इंजिनिअरींग प्रकल्प, स्थानिक तरुणांच्या हाताला काम देणारा, पडीक कातळ जमिनींना सर्वाधिक दर देणारा असा हा जणू ‘कामधेनू’ प्रकल्प होय.. हा प्रकल्प वाटद दशक्रोशीच्या विकासाची ‘नांदी’ ठरेल यात शंका नाही म्हणूनच आपण सर्वांनी या प्रकल्पाचे खुल्या दिलाने सहर्ष स्वागत करूंया” असे त्यांनी सर्वांना जोशपूर्ण आवाहन केले.