अमरावती/नागपूर येथील एका संकेतस्थळाच्या माध्यमातून संगमेश्वरातील एका तरुणाची तब्बल ६ लाख ६२ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेने ही फसवणूक केली असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील नितीन बांबाडे यांनी लग्नासाठी अमरावती/नागपूर येथील एका संकेतस्थळावर आपला ‘बायोडाटा’ अपलोड केला होता. त्यानंतर या संस्थेकडून त्यांना ठाण्यात राहणाऱ्या प्रियंका विनोद लोणारे नावाच्या तरुणीचा बायोडाटा देण्यात आला. बायोडाटा पसंत पडल्यानंतर नितीन आणि प्रियंका यांच्यात फोनवर बोलणे सुरू झाले. बोलता बोलता प्रियंकाने लग्नाचे आश्वासन दिले आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी नितीनकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. तिने किरकोळ खर्च, तिच्या अॅपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी आणि एम्ब्रॉयडरी मशीन खरेदीसाठी पैसे हवे असल्याचे सांगितले.
नितीनने तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या फोन नंबरशी संलग्न असलेल्या जीपे आणि फोन पे खात्यांवरून वेळोवेळी तिला पैसे पाठवले. त्याने जी पेद्वारे ३ लाख १३ हजार ६१० रुपये आणि फोन पेद्वारे ३ लाख ४९ हजार रुपये, असे एकूण ६ लाख ६२ हजार ६१० रुपये दिले. एवढी रक्कम दिली, पण प्रियंका लग्नाबद्दल काही बोलेना. पैसे परत करण्याची मागणी केल्यावर ती टाळाटाळ करू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नितीन बांबाडे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, प्रियंका लोणारे हिने ६ मार्च ते २६ ऑगस्ट या कालावधीत ही फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रियंका लोणारेचा शोध घेतला जात आहे. संकेतस्थळवरून कोणताही व्यवहार अथवा विवाह संबंधीची प्रक्रिया करताना ती अधिकृत असल्याची खात्री करा. त्यानंतरच त्यावर पुढील व्यवहार करा, असे आवाहन पोलिसांतून केले आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीची आणखी कोणाची फसवणूक झाल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे सांगण्यात आले आहे.