रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्याने गेली अनेक वर्षे जातीच्या पुराव्यापासून वंचित राहिलेल्या कोकणातील लाखो कुणबी बांधवांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशानुसार, शासनाने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने केलेल्या अभिलेख तपासणीत आढळून आलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे आता जातीचा दाखला व जात पडताळणी दाखला देण्याची सहमती प्रशासनाने दर्शवली आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाल्याची माहिती कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समिती राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांनी दिली आहे.
कुणबी समाजबांधवांना जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी १९६७ पूर्वीचा जातीचा पुरावा जोडावा लागत असे; मात्र या पुरावा मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याने हजारो कुणबी बांधवांना जातीच्या दाखल्यापासून वंचित राहावे लागत होते. याबाबत कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समितीने पुढाकार घेऊन पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व समाजकल्याण अधिकारी यांच्या समवेत महसूल प्रशासनातील प्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीत कुणबी बांधवांना भेडसावणाऱ्या जातीच्या पुराव्याच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. पालकमंत्र्यासमवेत झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली.
ज्या कुणबी बांधवांना आपल्या जातीच्या पुराव्यासाठी अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी व समस्त कुणबी समाजासाठी पडताळणीत आढळून आलेल्या नोंदीचा जातीसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसे आदेशही पालकमंत्री सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी व समाजकल्याण अधिकाऱ्यांनी जातीच्या दाखल्यासाठी ही नोंद पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची सहमती दर्शवली. त्यामुळे दीपक नागले व रमेश सूद यांनी तहसीलदार शीतल जाधव यांची भेट घेऊन कुणबी बांधवांना या नोंदीचा दाखला मिळावा यासाठी मंडळनिहाय शिबिरे घेण्याची मागणी केली. त्यानुसार तालुक्यात लवकरच मंडळनिहाय शिबिरे घेण्यात येतील, असे तहसीलदार जाधव यांनी सांगितले.