27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriशीळ'च्या उंचीचा प्रस्ताव बासनात, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार गाळ काढणार

शीळ’च्या उंचीचा प्रस्ताव बासनात, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार गाळ काढणार

धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला असला तरीही गाळ काढला, तर पाणीपातळी वाढणार आहे.

शीळ धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव पालिकेने बासनात गुंडाळला आहे. फणसवळे येथील ग्रामस्थांच्या विरोधानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी ही फाईल बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याची तत्काळ नगरपालिकेने अंमलबजावणी केली आहे. उंची वाढवण्याऐवजी पाण्याचा अधिक साठा व्हावा म्हणून शीळ आणि पानवल धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव पालिकेला तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या उंचीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मागणीनुसार पालिकेने पाटबंधारे विभागाकडे पाठवला होता. यामध्ये शीळ धरणाची उंची सुमारे ३ मीटर म्हणजे ९ फुटाने वाढवण्यात येणार होती. हे धरण फणसवळे ग्रामपंचायत हद्दीत आहे.  शीळ धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न फणसवळेवासीयांना अडचणीचा ठरणार होता. या प्रस्तावामुळे फणसवळे ग्रामपंचायत हद्दीत नाराजी पसरली होती.

विस्थापित होण्याची ग्रामस्थांना भीती होती. यावरून स्थानिक पातळीवर राजकारणही सुरू झाले होते; मात्र पालकमंत्री सामंत यांनी फणसवळेचा दौरा केल्यावर धरणाच्या उंचीचा प्रश्नावर चर्चा झाली. त्यावर त्यांनी तत्काळ तोडगा काढून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. धरणासंदर्भातील कार्यवाही तत्काळ थांबवण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्याप्रमाणे कार्यवाही थांबली. धरणाविषयीचा प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. दरम्यान, रत्नागिरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शीळ धरणातील साठा वाढवणे आवश्यक आहे. धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला असला तरीही गाळ काढला, तर पाणीपातळी वाढणार आहे. त्याचा फायदा नक्कीच भविष्यात रत्नागिरीकरांना होऊ शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular