तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीची सरासरी गाठली असून, तुलनेत १०० मिलिमीटर अधिक नोंद झाली आहे. सरी थांबून कोसळत असल्याने नद्यांच्या पाणी पातळी थोडी घटली आहे. खेड शहरावर पुराची टांगती तलवार कायम राहिली आहे. नद्यांच्या किनाऱ्यांवरील भातशेती गेल्या पाच-सहा दिवसांपासून पाण्याखाली गेल्यामुळे नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. किनारी भागातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत खेड तालुक्यात १२८.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेडमधील जगबुडी नदी ६.७५ मीटर पातळीवरून वाहत असून, गेले दहा दिवस इशारा पातळीवर आहे.
गेल्या आठवडाभरात दोनवेळा जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, १०.८० मीटर महत्तम पातळी गेल्या आठ दिवसांमध्ये गाठली होती. जगबुडी नदीच्या उपनद्या नारंगी, चोरद या नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली असून, या सर्व नद्यांच्या किनाऱ्यांवरील भातशेती गेल्या पाच- सहा दिवसांपासून पाण्याखाली आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे चोवीस तासांत खेड तालुक्यात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खेड-दापोली मार्ग, खेड-बहिरवली मार्ग, खेड-शिवमार्ग येथील खंडित झालेली वाहतूक बुधवारी सकाळपासून पूर्ववत झाली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमूळे काही भागातील एसटी वाहतूक तसेच इतर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. खेड बाजारपेठेमध्ये गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम जाणवत असून, ग्राहकांची गर्दी रोडावली आहे. त्यामुळे व्यापारी धास्तावले आहेत. खेड शहरातील मटण-मच्छी मार्केट परिसर, सफा मस्जिद चौक, बंदरनाका आदी भागात या आठवड्यात दोनवेळा जगबुडीच्या नदीच्या पुराचे पाणी घुसले होते. सध्या खेड बाजारपेठेत पाणी नसले तरीही बंदररोड हा पाण्याखाली आहे.